राज्यातल्या पहिली ते बारावी इयत्तेच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्यात याव्यात, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, येत्या २४ तारखेपासून राज्यातल्या शाळा सुरू होतील. करोना परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावा असंही राज्य सरकारनं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातल्या शाळा सुरू करण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुरलीधर मोहोळ म्हणतात, “राज्यातल्या शाळा २४ तारखेपासून सुरू कराव्यात असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की त्या त्या ठिकाणची करोनाची स्थिती पाहता स्थानिक पातळीवर त्याचा निर्णय घेण्यात यावा. गेल्या काही दिवसातली पुण्यातली करोना स्थिती पाहिली तर लक्षात येईल की चढत्या क्रमाने संख्या वाढत आहे. आज एका दिवसात ७ हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसत आहे. राज्य सरकारने पहिली ते बारावीपर्यंत सगळ्या शाळा सुरू करण्यास सांगितलं आहे. मी स्वतः शहरातल्या काही बालरोगतज्ज्ञांशी बोललो, त्यावेळी वाटलं की पहिली ते दहावीच्या शाळांबद्दल फेरविचार करावा”.

महापौर पुढे म्हणाले, “पहिल्या लाटेत ज्या मुलांना करोनाची लागण होत होती त्यांना लक्षणं दिसत नव्हती. पण या लाटेत ज्या मुलांना करोनाची लागण झाली त्यांना ताप य़ेत आहे, पहिल्या लाटेच्या तुलनेत तीव्र लक्षणं दिसत आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याविषयी पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा होईल. त्याचबरोबर तज्ज्ञ, पालक, शिक्षणसंस्था यांच्याशीही आम्ही चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसातली शहरातली वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुलांची सुरक्षा हेच आमचं प्राधान्य आहे. गेल्या साधारण महिन्याभरात ३,५०० मुलं बाधित झाली आहेत, त्यापैकी १०० मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सर्व घटकांशी चर्चा करूनच घेतला जाईल”.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murlidhar mohol schools in pune reopen discuss with experts vsk
First published on: 20-01-2022 at 21:41 IST