शालेय विद्यार्थ्यांना वनविभागाच्या जागेत स्वत:च्या नावचे झाड लावण्याची संधी मिळणार आहे. सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिर ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘#मायट्री’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून शहरातील ३५ शाळांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली आहे.
९ सप्टेंबरला हा उपक्रम सुरू केला जात असून पहिल्या टप्प्यात महंमदवाडी आणि एनआयबीएम रस्त्यावरील वनविभागाच्या दोन जागांमध्ये झाडे लावली जातील. प्रत्येक झाडाला ते झाड ज्याने लावले त्या विद्यार्थ्यांच्या नावाचा ‘टॅग’ लावला जाणार असून त्या टॅगवर शाळेचे नाव व वृक्षारोपणाची तारीख देखील लिहिलेली असेल. त्याद्वारे त्याचे झाड ओळखू येईल, अशी माहिती उपक्रमाचे संचालक प्रा. डॉ. युवराज लाहोटी यांनी दिली. ते म्हणाले, ‘पहिल्या महिन्यात पाच हजार झाडे लावली जाणार आहेत. लावलेली सर्वच झाडे जगत नाहीत, त्यामुळे झाडांवर देखरेख करण्यासाठी व त्यांची उंची किती वाढली, खताची गरज काय हे नमूद करण्यासाठी प्रत्येक झाडाचे एक ‘ग्रोथ कार्ड’ ठेवले जाईल. वन विभागाने उपक्रमात देशी झाडे लावण्यास सांगितले असून आयुर्वेदिक झाडांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात हिरडा, बेहडा, अर्जुन, वड ही झाडे लावली जातील. एकूण १५ हजार झाडे लावून ती वाढवण्याचा संकल्प असून या महिन्यानंतरही उपक्रम सुरू राहील.’
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2015 रोजी प्रकाशित
शालेय मुलांना स्वत:च्या नावचे झाड लावण्याची संधी!
विद्यार्थ्यांसाठी ‘#मायट्री’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
Written by दिवाकर भावे

First published on: 09-09-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My tree project by mahalaxmi temple trust