तीन वर्षांपूर्वी बावधन रस्त्यावर संगणक अभियंता दर्शना टोंगरे या तरूणीच्या खून प्रकरणी सहा जणांची मुंबईमध्ये नुकतीच नार्को चाचणी घेण्यात आली. या गुन्ह्य़ाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे असून या सहा जणांच्या आणखी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत.
आयबीएम कंपनीत प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून काम करणाऱ्या दर्शनाचा बावधन रस्त्यावर शिंदे पेट्रोल पंपासमोर चाकूने भोसकून ३० जुलै २०१० रोजी खून झाला होता. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनेही तपास केल्यानंतर आरोपी सापडले नाहीत. त्याामुळे दर्शनाचा भाऊ केतन टोंगरे याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार डिसेंबर २०१२ मध्ये या गुन्ह्य़ाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील करत आहेत.
या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी दर्शना मित्र, नाशिक येथील नातेवाईक, दोन रिक्षावाले अशा सहा जणांची नार्को, ब्रेन मॅपिंग, सायको अॅनालिसिस आणि पॉलिग्राफ अशा एकूण चार चाचण्या घेण्यात येणार आहेत. यापैकी सहा जाणांची मुंबई येथील प्रयोगशाळेत नुकतीच नार्कोटेस्ट घेण्यात आली आहे. इतर तीन चाचण्याही लवकरच घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली.