प्रभाग क्रमांक ३८ राजीवनगर-बालाजीनगर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजीवनगर-बालाजीनगर या प्रभागाची रचना करताना मनसेचे सध्याचे या भागाचे नगरसेवक वसंत मोरे यांचा कात्रज गावठाणाचा परिसर आणि काँग्रेसचे अभिजीत कदम यांचा प्रभाग अन्यत्र जोडण्यात आल्यामुळे नव्याने तयार झालेला प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार आहे. या प्रभागात मनसे, शिवसेना आणि भाजपला मानणारा वर्ग असला तरी सर्व विरोधक एकवटल्यावरच येथील चित्र पालटू शकते, असेच सध्याचे वातावरण आहे.

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा सध्याचा बालाजीनगर हा प्रभाग, मनसेचे माजी गटनेता वसंत मोरे यांच्या प्रभागातील काही भाग आणि काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत कदम यांच्या प्रभागातील लेक टाऊन परिसर असा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असले तरी मनसे, शिवसेना आणि भाजपला मतदान करणारा वर्ग या प्रभागात आहे. येथे काँग्रेसचीही मतपेढी असून तुल्यबळ उमेदवार न आल्यास हा मतदार अन्यत्र वळण्याची शक्यता आहे. या प्रभागात वसंत मोरे यांनी संघटनात्मक बांधणी केली होती. मात्र त्यांचा परिसर आंबेगाव दत्तनगर-कात्रज गावठाणला जोडण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी तेथून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसचे अभिजीत कदम यांच्या जुन्या प्रभागाचा बहुतांश भाग हा प्रभाग क्रमांक चाळीसमध्येच येत असल्यामळे तेही याच प्रभागातून इच्छुक आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये दत्तात्रय धनकवडे यांचा मार्ग मोकळा असल्याचे दिसून येत आहे.

बालाजीनगर, लेक टाऊन, सुखसागरनगर या परिसरात बाहेरून वास्तव्यास आलेल्यांची संख्या मोठी आहे. सुखसागरनगर येथे राजीव गांधी वसाहत ही मोठी झोपडपट्टी आहे. शिवसेनेचे बाळा ओसवाल यांनी या प्रभागात तीनवेळा निवडणूक लढविली असून दोन वेळा ते पराभूत झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची पत्नी दिपाली ओसवाल याच प्रभागातून विजयी झाल्या होत्या. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान निर्माण करू शकतील, अशी चर्चा आहे. बालाजीनगर मधील परिस्थिती वेगळी असून दत्तात्रयोनकवडे यांनी सलग दोन वेळा मोठय़ा मतांनी विजय मिळविला होता. खडकवासला मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक असल्यामुळे त्यांनी महापालिका निवडणुकीतीही सर्व शक्ती पणाला लावण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. नवीन प्रभाग रचनेत एक जागा ओबीसीसाठी खुली असून महिलांच्या दोन्ही जागा आणि अन्य एक जागा सर्वसाधारण गटासाठी खुली असल्यामुळे विद्यमान नगरसेवकांपुढे तशी कोणतीही अडचण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र यावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp in pune election