मराठीमध्ये मुलांसाठी सकस व दर्जेदार साहित्याची गरज आहे, असे मत लेखिका व सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावसकर यांनी व्यक्त केले.
अक्षरधारा व रोहन प्रकाशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बुधवारी राजीव तांबे लिखित ‘प्रेमळ भूत’ या पुस्तकाच्या संचाचे प्रकाशन गावस्कर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे, रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर या वेळी उपस्थित होते. प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये राजीव तांबे यांनी ‘प्रेमळ भूत’मधील एक कथाही ऐकविली. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाला लहान मुलांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती. मुलांना मदत करीत असलेल्या पुस्तकातील भुताची कथा तांबे यांनी मुलांबरोबर मोठय़ांनाही भावणाऱ्या शैलीमध्ये सादर केल्याने त्याचा सर्वानीच आनंद लुटला.
तांबे यांच्या पुस्तकाबाबत बोलताना गावस्कर म्हणाल्या, की मुलांच्या कल्पनाशक्तीला तांबे यांनी वाव दिला आहे. जिथे मुलांचा कोंडमारा झाला, कठीण परीक्षा घेतली गेली, त्या सर्वच बाबतीत संबंधितांना पुस्तकातील भुताच्या रूपाने त्यांनी शिक्षा दिली आहे. मुलांना अभ्यासाचा ताण यावा, ही वाईट गोष्ट आहे. त्यासाठी काहीतरी झाले पाहिजे. तांबे यांच्या मनाशी अगदी एकरूप होत गिरीश सहस्रबुद्धे यांनी पुस्तकातील चित्र रेखाटली आहेत. मुलांना आनंद देणारे अशा प्रकारचे दर्जेदार व सकस साहित्य मराठीत आले पाहिजे.