निरंजन घाटे यांचे आज पंचाहत्तरीमध्ये पदार्पण
पुणे : भूशास्त्रामध्ये पदवी संपादन केल्यामुळे विज्ञान विषयामध्ये लेखन करत होतो. ‘मनोहर’, ‘किलरेस्कर’, ‘राजस’ या मासिकांमध्ये माझे लेखन प्रसिद्ध झाले. आणीबाणीच्या काळात सेन्सॉरशिप असल्यामुळे प्रत्येक मजकूर प्रसिद्ध होण्यापूर्वी पोलिसांकडे तपासण्यासाठी जात असे. ‘आमच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या इंदिराकाकू आल्या नाहीत’ या वाक्यात इंदिरा या शब्दामुळे कथा नाकारल्या गेल्याची उदाहरणे त्या काळात होती. मात्र, विज्ञानाविषयी लेखनाकडे पोलीस दुर्लक्ष करायचे. विज्ञानलेखन एका शब्दाची काटछाट न करता प्रसिद्ध झाले. त्या काळात विज्ञान लेखनाला मागणी वाढली आणि आणीबाणीने माझ्यातील विज्ञानलेखक घडविला, अशी भावना ज्येष्ठ विज्ञान कथालेखक निरंजन घाटे यांनी व्यक्त केली.
विज्ञान कथा-कादंबरीलेखन करणारे घाटे शुक्रवारी (१० जानेवारी) पंचाहत्तरीमध्ये पदार्पण करीत आहेत. १८५ हून अधिक पुस्तकांचे लेखक असलेल्या घाटे सध्या ‘पर्यावरणातील स्त्रिया’, ‘आरोग्यशास्त्रातील स्त्रिया’, ‘साहसी स्त्रिया’ आणि ‘१०१ संशोधक स्त्रिया’ या चार पुस्तकांच्या लेखनामध्ये व्यग्र आहेत. ‘जागतिक हवामान बदल’ या विषयावर सध्या त्यांची लेखमाला सुरू आहे.
मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९७४ मध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान कथालेखन स्पर्धेत डॉ. जयंत नारळीकर यांना पहिल्या क्रमांकाचे,तर मला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. नारळीकर यांचा दबदबा असल्यामुळे डॉ. बाळ फोंडके, द. व्यं. जहागीरदार, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे असे विज्ञान कथालेखक प्रचंड मेहनत घेत होते. त्यामुळे मराठी विज्ञान कथा-कादंबरीलेखन सकस स्वरूपाचे झाले आहे, असे घाटे यांनी सांगितले. विनोदी आणि सामाजिक कथा मी लिहिल्या आहेत. मात्र, त्यापेक्षाही विज्ञानलेखक म्हणून मला मान्यता लाभली. त्या काळात स्कायलॅब यान चंद्रावर उतरले होते. डॉली ही क्लोन मेंढी अशा विज्ञान लेखनासाठी अनुकूल घटना घडत गेल्या. त्यामुळेही माझ्या हातून लेखन झाले, असेही घाटे यांनी सांगितले.
आता कोणीही विज्ञानलेखक
सध्या कोणीही चार विज्ञानाचे इंग्रजी शब्द वापरतो आणि विज्ञान कथालेखक म्हणून मिरवतो. भाषा बिघडली आहे. प्रकाशकही जसेच्या तसे हे लेखन प्रसिद्ध करतात, याकडे निरंजन घाटे यांनी लक्ष वेधले. सुलभ मराठीमध्ये विज्ञान लेखन करता येते. इंजिनीअरला अभियंता हा शब्द मराठीत रूजला आहे. ‘तुमच्या लेखनात एकही इंग्रजी शब्द नाही त्यामुळे आवडले’, असा वाचकांचा अभिप्राय ही मला प्रशंसा वाटते.