‘स्थानिक संस्था कर’ (एलबीटी) विरोधातील आंदोलनात सहभाग घेऊन ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या ‘ग्राहक पेठ’ ला सहकार खात्याने शुक्रवारी नोटीस बजावली आहे. दरम्यान, अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचे ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.
ग्राहक पेठ ही सहकारी संस्था आहे. ही ग्राहकांची चळवळ असल्याने ग्राहक पेठ संस्थेला एलबीटी विरोधातील आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. ग्राहक पेठ म्हणजे काही व्यावसायिक व्यापारी नव्हेत. त्यामुळे ग्राहकांची अडवणूक होत असताना ग्राहक पेठ बंद ठेवता येणार नाही, असे ग्राहक पेठला पाठविलेल्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले असल्याचे सहकार उपनिबंधक किरण सोनवणे यांनी सांगितले. ग्राहक पेठ लवकरात लवकर सुरू न केल्यास प्रशासक आणण्याची कारवाई करावी लागेल, असेही त्यामध्ये म्हटले आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, अशी नोटीस आलेली नाही. ग्राहक पेठ सरकारचे कोणतेही अनुदान घेत नाही. त्यामुळे सहकार खात्याला कारवाई करण्याचा कोणताही अधिकारच नाही. ग्राहक पेठ केवळ सभासदांना बांधिल आहे. त्यांच्यापैकी कोणाचीही बंद ठेवल्याबद्दल तक्रार नाही.