महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये सुरू झालेला वाद संपण्याची चिन्हे नसताना भारतीय जनता पक्षानेही कुस्ती स्पर्धेबाबत महापौरांना पत्र दिले असून ही स्पर्धा शहराच्या मध्य भागात झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
कसबा-विश्रामबागवाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष धनंजय जाधव आणि नगरसेविका प्रतिभा ढमाले यांनी ही मागणी केली असून त्यांनी तसा ठरावही क्रीडा समितीला दिला आहे. महापौर चषक कुस्ती स्पर्धा टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, सणस मैदान, स. प. महाविद्यालयाचे मैदान आदी ठिकाणी किंवा मध्य पुण्यातील अन्य एखाद्या मैदानात होऊ शकते. या स्पर्धेचा आनंद मध्य पुण्यातील नागरिकांनाही मिळाला पाहिजे, या दृष्टीनेच हा ठराव दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये ही स्पर्धा गेल्यावर्षीप्रमाणेच वारजे येथे भरवावी, का यंदा नव्याने खराडी भागात आयोजित करावी यावरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही एक पत्र महापौरांना दिले असून ही स्पर्धा मंगळवार पेठेतील शिवाजी आखाडय़ात व्हावी आणि स्पर्धेचे आयोजनही तालीम संघाकडे द्यावे, अशी मागणी केली आहे. काँग्रेसनेही या मागणीला पाठिंबा दिला आहे. ही स्पर्धा शिवाजी आखाडय़ातच व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली आहे. त्यापाठोपाठ आता भाजपच्या नगरसेवकांनी ही स्पर्धा मध्य पुण्यात भरवण्याबाबत ठराव दिल्यामुळे हा वाद पक्षनेत्यांच्या बैठकीकडे सोपवण्यात आला आहे.