अपघातांमध्ये रस्ता दुभाजकाला आदळूनही काही इजा झाली नाही तर.. ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे पुण्यातील एका संशोधकाने. रस्ता दुभाजकाला आदळून अपघात झाला, तरी इजा होण्याचे अथवा वाहनाचे नुकसान तुलनेने कमी करणाऱ्या रस्तादुभाजकांची निर्मिती पुण्यातील संशोधकांनी केली आहे.
रस्ता दुभाजकाला आदळल्यामुळे गंभीर जखमी होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. रस्ता दुभाजकावर आपटून मेंदू, मणका किंवा हाडांना इजा होते. त्यामुळे अपघाती मृत्यूच्या प्रमाणात वाढ होते. यावर भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक संतोष चव्हाण यांनी उत्तर शोधले आहे. रस्ता दुभाजकाला आदळूनही इजा होण्याचे प्रमाण कमी होईल असे रस्ता दुभाजक तयार करण्याचे काम सध्या हे प्राध्यापक करत आहेत.
सध्या आपल्याकडे सिमेंटचे रस्ता दुभाजक वापरण्यात येतात किंवा दगडांचा वापर करण्यात येतो. मात्र, त्याऐवजी नॅनो फायबर, रबर यांपासून रस्ता दुभाजक तयार करण्याचे काम चव्हाण करत आहेत. या दुभाजकावर आपटलेली वस्तू उसळी घेण्याचे प्रमाण मर्यादित आहे. त्याचप्रमाणे हे दुभाजक मजबूत असले, तरीही दगडाइतके कठीण नाहीत. या दुभाजकांमध्ये वापरण्यात आलेल्या रबर, नॅनो फायबर या साहित्यामुळे आदळून होणाऱ्या आघाताची तीव्रता कमी होते. त्यामुळे इजा होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. या रस्तादुभाजकांच्या निर्मितीचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्याचा टिकाऊपणा वाढवण्याच्या दृष्टीनेही चाचण्या सुरू आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले, ‘‘या दुभाजकामध्ये वापरण्यात आलेल्या साहित्यामुळे इजा होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. याबाबत अजून विविध चाचण्या सुरू आहेत. विशेषत: गाडीचा वेग आणि त्यानुसार दुभाजकाचा टिकाऊपणा यादृष्टीने या चाचण्या सुरू आहेत. याची किंमत थोडी जास्त असू शकते. मात्र, त्याचा अधिक चांगला उपयोगही होऊ शकतो. दुभाजकांच्या निर्मितीचे काम सध्या सुरू आहे.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now road dividers made from rubber nano fibre