भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांचा ‘डीएनए’ एकच असल्याचे आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुस्लिमांनी हे समजून घ्यावे की त्यांचा पूर्वज हिंदूू आहे, असे विधान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. या देशात हिंदूू बहुसंख्य असल्यामुळेच येथे धर्मनिरपेक्षता आहे, त्यामुळे हिंदूूचे हे बहुमत कोणालाही बदलू देऊ नका, असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शंखनाद’ या विद्यार्थी संमेलनात स्वामी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, परिषदेचे प्रदेश सहमंत्री प्रमोद कराड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिषदेच्या पुणे महानगरचे अध्यक्ष आनंद काटीकर, मंत्री आनंद पुरोहित त्या वेळी उपस्थित होते.
स्वामी म्हणाले, चुकीचा इतिहास सांगून देश तोडण्याचा प्रयत्न झाला. पण, या देशातील सर्वाचा ‘डीएनए’ एकच आहे. अगदी ब्राह्मण व अनुसुचित जातींचा ‘डीएनए’ही एकच आहे. पुढील पंधरा ते वीस वर्षांत सर्वात विकसित देश होण्याची भारतात क्षमता आहे. त्यात तरुणांचे विशेष योगदान असेल. देशात आज ८० टक्के हिंदूू आहेत. त्यामुळेच येथे धर्मनिरपेक्षता आहे. मुस्लीमांची संख्या जास्त असणाऱ्या देशांत धर्मनिरपेक्षता राहिली नाही. त्यामुळे हिंदूूंचे बहुमत राहिले पाहिजे. कुणाला किती आपत्य असावीत तसेच एकापेक्षा जास्त विवाह करू नयेत, यासाठी एक निती व सर्वासाठी समान कायदा हवा. खरा इतिहास जाणून घेत त्यातील चुका दूर केल्या पाहिजेत. त्यामुळे वास्तविक इतिहासासाठी आता अभ्यासाची पुस्तकेही बदलावी लागतील.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, देशाला बदलण्याची क्षमता तरुणांत आहे. तरुणांच्या विकासाची झेप भ्रष्टाचार थांबवेल. तरुणांचा अंकुश व शक्ती देशातील विधायक कामांसाठी वापरली पाहिजे.
धर्माधिकारी म्हणाले, तरुणांनी प्रथम स्वत:ला ओळखले पाहिजे. ही ओळख झाल्यानंतर करिअरची निवड व निवडलेल्या करिअरमध्ये प्रतिभावान झाले पाहिजे. कोणत्याही कामातून भारतमातेचा सेवक होण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.
ओबामा यांनी राज्यघटना वाचली नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्यातून जाताना केलेले सद्भावनात्मक भाषण योग्य नव्हते, असे मत व्यक्त करून सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, आपल्या राज्यघटनेनुसार सर्वधर्म समभाव, कायदा- सुव्यवस्था, नैतिकता आदी गोष्टींची देशात अंमलबजावणी केली जाते. मात्र, भाषण करण्यापूर्वी ओबामा यांनी राज्यघटना वाचली नाही.
सुभाषबाबुंच्या मृत्यूचा लवकरच खुलासा
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला, याचा खुलासा लवकरच होणार आहे. हा खुलासा झाल्यानंतर मात्र काँग्रेसची मंडळी रस्त्यावर कोणत्या तोंडाने फिरतील, हे आम्हाला पहायचे आहे, असे वक्तव्यही सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या भाषणाच्या दरम्यान केले.