केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांची टीका
काँग्रेसने वर्षांनुवर्षे सत्ता उपभोगली. मात्र, त्या काळात त्यांनी फक्त भ्रष्टाचार केल्याची टीका केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी चिंचवड येथे बोलताना केली.
शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, प्रवक्तया मीनाक्षी लेखी, खासदार अमर साबळे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.
सिन्हा म्हणाले, की काँग्रेसने देशातील जनतेपेक्षा स्वत:च्या कुटुंबाला अधिक महत्त्व दिले. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७० वर्षांनंतरही शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जनआंदोलन हाती घेतले आहे. ते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. सर्वाची साथ, सर्वाचा विकास ही मोदी सरकारची भूमिका आहे. प्रवक्तया मीनाक्षी लेखी म्हणाल्या, एकाच कुटुंबातील तीन बंधूंनी देशासाठी बलिदान देणे ही मोठी गोष्ट आहे. त्यांच्या बलिदानाचे मोल लक्षात ठेवले पाहिजे. शहराध्यक्ष जगतापांनी, चापेकर बंधूच्या नावाचे पोस्टाचे तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी या वेळी केली.