बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८१ व्या स्थापना दिनानिमित्त ‘मुद्रा कार्ड’चा आरंभ बँकेचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक एस. मुहनोत यांच्या हस्ते करण्यात आला. सूक्ष्म आणि लघु नवोद्योजकांच्या व्यवसाय-उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुद्रा कार्ड योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
मुद्रा कार्ड हे रुपे डेबिट कार्ड असून कोणत्याही अडचणीशिवाय सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या खेळत्या भांडवलासाठी उपयुक्त आहे. या कार्डद्वारे कोणत्याही एटीएम द्वारा रोख रक्कम काढता येते. याच बरोबर व्यवसायासाठी आवश्यक वस्तू दुकानामधून खरेदी केल्यास पीओएस मशीनद्वारे कार्ड द्वारे रक्कम देता येते. पंतप्रधानांच्या पुढाकाराने मुद्रा योजनेचा प्रारंभ झाला असून या योजनेमधून बिगर शेती प्रकारातील सूक्ष्म आणि लघु व्यवसायामधून उत्पन्न निर्माण करणाऱ्या निर्मिती, व्यापार आणि सेवा अशा तीनही विभागातील नवोद्योजकांकरिता दहा लाखांपर्यंत कर्ज मिळण्याची सोय बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे करण्यात आली आहे. या कर्जासाठी बँकेने कर्जाचा व्याजदर बेस रेट प्रमाणे लागू केला आहे. याशिवाय या योजने अंतर्गत पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. या कार्यक्रमाला बँकेचे सरव्यस्थापक राजकिरण भोईर, एन.व्ही. पुजारी, आर.एच. फडणीस, व्ही. म्हस्के आदी उपस्थित होते.