‘सरस्वती विद्यालय युनियन प्रायमरी स्कूल’ ही शाळा भाषिक अल्पसंख्याक असली, तरी शाळेने शासनाची विविध प्रकारे मदत घेतली असल्यामुळे शाळेला शिक्षण हक्क कायदा लागू होत असून शाळेने वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवाव्यात, असे आदेश पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने शाळेला दिले आहेत.
रास्ता पेठेमधील ‘सरस्वती विद्यालय युनियन प्रायमरी स्कूल’ या शाळेला भाषिक अल्पसंख्याक दर्जा आहे. शाळेला तमीळ भाषकांसाठी अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला आहे. शाळा भाषिक अल्पसंख्याक आहे. शिवाय शाळेला थेट अनुदान मिळत नसल्यामुळे शाळेला शिक्षण हक्क कायदा लागू होत नसल्याचे शाळेचे म्हणणे होते.
शाळेकडून शिक्षण हक्क कायद्याचा भंग केल्याच्या तक्रारी शिक्षण मंडळाकडे येत होत्या. त्या पाश्र्वभूमीवर शाळेची चौकशी करण्यात आली. शाळा भाषिक अल्पसंख्याक असली, तरी शाळेने मैदान, संगणक अशा प्रकारची मदत शासनाकडून घेतली आहे. त्यामुळे शाळेला विनाअनुदानित अल्पसंख्याक म्हणता येऊ शकत नाही, असा निर्णय शिक्षण विभागाच्या चौकशी समितीने घेतला आहे. शाळेने शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे, असा आदेश शिक्षण मंडळाने शाळेला दिला आहे.