‘लोकसत्ता’च्या पाठपुराव्यास यश

पुणे : धायरी येथील कै . मुरलीधर लायगुडे रुग्णालयातील प्राणवायू विभाग अखेर शनिवारपासून कार्यान्वित करण्यात आला. सोमवारपासून (१२ ऑक्टोबर) पहिल्या मजल्यावर प्राणवायू सुविधा असलेल्या तीस खाटा सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. प्राणवायू सुविधा विभाग कार्यान्वित झाल्यामुळे यापूर्वी बंद असलेल्या सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा येथे सुरू झाल्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

लायगुडे रुग्णालयात प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा कार्यान्वित करण्यामध्ये महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून दिरंगाई होत होती. सिंहगड रस्ता परिसरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अत्यावश्यक सेवा महापालिके ला महिना होत आला तरी सुरू करता आली नव्हती. प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका सिंहगड रस्ता परिसरातील शेकडो करोनाबाधित रुग्णांना बसून रुग्णांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने  बुधवारच्या (७ ऑक्टोबर) अंकात प्रकाशित के ले होते. त्यानंतर महापालिके चा आरोग्य विभाग, लायगुडे रुग्णालय व्यवस्थापन आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून तातडीने हा विभाग कार्यान्वित करण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ आणि खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत हा विभाग शनिवारी सुरू करण्यात आला.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात शनिवारी पाच खाटा सुरू करण्यात आल्या. सोमवारपासून (१२ ऑक्टोबर) पहिल्या मजल्यावरील ३० खाटा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील ३० खाटांमध्येही प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिके च्या कोणत्याही रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येणार नाही, असे मुरलीधर मोहोळ यांनी या वेळी सांगितले.

शहरात करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम धायरी येथील मुरलीधर लायगुडे रुग्णालयात करोना काळजी के ंद्र सुरू करण्यात आले. या रुग्णालयाची क्षमता ६० खाटांची आहे. त्यामुळे या रुग्णालयात प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पहिल्या मजल्यावर ३० खाटा कार्यान्वित करण्यासाठीची प्रक्रिया महापालिके च्या विद्युत विभागाकडून राबविण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पाहणी दौरेही झाले. मात्र, महिना झाला तरी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली नव्हती.  वास्तविक १ ऑक्टोबरपासून पहिला मजल्यावरील ३० खाटांची सुविधा सुरू होईल, असा दावा सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, मुख्य आरोग्य विभाग आणि विद्युत विभागाकडून करण्यात आला होता.