‘मराठीत विजय तेंडुलकर हे माझे आवडते नाटककार आहेत. त्यांच्या ‘गिधाडे’ या नाटकातले डॉ. लागूंचे काम माझ्या भावनापटलावर कोरले गेले आहे. तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक मी इंग्लिशमध्ये करणार आहे,’ असा मनोदय ज्येष्ठ रंगकर्मी अलेक पदमसी यांनी बोलून दाखवला. ‘महेश एलकुंचवार हे देखील अतिशय उत्कृष्ट नाटककार आहेत. ‘मराठीत ‘थिएटर अॅकॅडमी’ने काही उत्तम नाटके आणली. ‘घाशीराम कोतवाल’ ही भारतातील सवरेत्कृष्ट नाटय़निर्मिती आहे,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
‘तन्वीर सन्मान’ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या पदमसी यांनी बुधवारी आपल्या नाटय़प्रवासाबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी वयाच्या सातव्या वर्षी ‘र्मचट ऑफ व्हेनिस’ या नाटकात काम करायला सुरुवात केली. रंगमंचावर चढलो आणि ते दिवे आणि प्रेक्षक बघून प्रेमातच पडलो! नाटय़गृहात गेल्यावर मला खऱ्या अर्थाने घरी आल्यासारखे वाटते. मी शाळा आणि महाविद्यालयात नाटके बसवली आणि दिग्दर्शक व्हायचे निश्चित केले. दिग्दर्शक म्हणून मला विनोदी नाटके विशेष आवडत नाहीत. मानवी जीवनावर आणि समाजात बदल घडवण्याची क्षमता नाटकात असते. माझ्या काळी मुंबईत इंग्लिश नाटकात काम करणारे केवळ तीन ‘थिएटर ग्रुप’ होते, आता तरुणांचे असे चाळीस गट आहेत. एकदा नाटकाची चव घेतली की ते सोडणे अशक्यच असते.’
राहून गेलेला ‘तुघलक’ चित्रपट!
चित्रपटनिर्मितीबद्दल पदमसी म्हणाले, ‘मी २०० जाहिराती केल्या आहेत, पण चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया मला कंटाळवाणी वाटते. गिरीश कर्नाड यांचे ‘तुघलक’ हे नाटक मी अभिनेते कबीर बेदी यांना घेऊन केले होते. ऐंशीच्या दशकात त्याच नाटकावर अमिताभ बच्चन यांना घेऊन चित्रपट करायचे मी ठरवले आणि अमिताभनीही काम करण्याची तयारी दाखवली. पण तेव्हाच ‘कुली’ चित्रपटातील अपघाताचे निमित्त झाले आणि अमिताभ पुढील दोन वर्षे काम करू शकले नाहीत. नंतर मी त्यांना पुन्हा ‘तुघलक’साठी विचारले परंतु त्या वेळी ‘बॉक्स ऑफिस’वर पुनरागमन करणे आवश्यक असल्यामुळे गंभीर चित्रपट स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.’
‘असहिष्णुता हजार वर्षांपासून आहेच’
वाढत्या असिष्णुतेबद्दल होणाऱ्या चर्चेबाबत पदमसी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘देशात असहिष्णुता आहे का, हा प्रश्न देशातील २० कोटी दलितांना, १५ कोटी मुस्लिमांना, ईशान्य भारतातील ४ कोटी नागरिकांना आणि ५० कोटी महिलांना विचारायला हवा. हजार वर्षांपासून दलितांना असहिष्णुतेचा सामना करावा लागतोच आहे. कायम असहिष्णुता आहेच. सरकारला असहिष्णुतेचा विसर पडायला नको. ‘दादरी’ प्रकरणानंतर राष्ट्रपतींनी असहिष्णुतेबद्दल प्रतिक्रिया दिली. पण सरकार अहिष्णुतेच्या विरोधात बोलत नाही. मात्र देशातील सद्य:स्थितीचा विचार करता या गोष्टींमध्ये बदल घडून येत आहे असे वाटते.’
‘स्पीलबर्ग’नेही चित्रपटात भूमिका देऊ केली होती!
प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी आपल्याला ‘इंडियाना जोन्स अँड द टेंपल ऑफ डूम’मधील डाकूच्या भूमिकेसाठी विचारले होते, अशी आठवण पदमसी यांनी सांगितली. परंतु या भूमिकेतून भारतीयांची जगासमोर होणारी प्रतिमा बरी झाली नसती असे वाटल्याने ती भूमिका नाकारली, असे ते म्हणाले. नंतर अभिनेते अमरीश पुरी यांनी ही भूमिका केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
पदमसी ‘बाइंडर’ इंग्लिशमध्ये आणणार!
‘मराठीत विजय तेंडुलकर हे माझे आवडते नाटककार आहेत. त्यांच्या ‘गिधाडे’ या नाटकातले डॉ. लागूंचे काम माझ्या भावनापटलावर कोरले गेले आहे
First published on: 10-12-2015 at 03:21 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padamsee sakharam binder english rolling