अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या कट्टरवादी आणि मूलतत्त्ववादी कारवाया या पाकिस्तान पुरस्कृतच आहेत, असा आरोप अफगाणिस्तानमधील माजी विरोधी पक्षनेते आणि माजी उपाध्यक्ष अहमद झिया मसूद यांनी शुक्रवारी केला. या अराजकतेविरोधात लढण्यासाठी अफगाणिस्तानला भारताचे सहकार्य हवे आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२४ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन शुक्रवारी झाले. या तुकडीमध्ये अफगाणिस्तानच्या चार स्नातकांनी हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामध्ये अहमद जुबैर मसूद याचा समावेश असून तो अहमद झिया मसूद यांचा पुत्र आहे. आपल्या पाल्याचा सहभाग असलेले दीक्षान्त संचलन पाहण्यासाठी अहमद झिया मसूद ‘एनडीए’मध्ये आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अहमद झिया मसूद म्हणाले,की तालिबानी कारवायांनी अफगाणिस्तान त्रस्त झाला आहे. तालिबान्यांच्या या कट्टरवादी आणि मूलतत्त्ववादी कारवायांना पाकिस्तानकडून उघडपणे प्रोत्साहन लाभत आहे. अफगाणिस्तानचे भारताशी पूर्वीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सध्याच्या या अशांत वातावरणात भारताचे अफगाणिस्तानला सहकार्य लाभेल. अवजड साधनसामग्री आणि सुरक्षा प्रश्नामध्ये भारतातर्फे मदतीचा हात मिळेल याविषयी आम्ही आशावादी आहोत. अफगाणिस्तानमधील सैन्यदलामध्ये तीन लाख लोकांचा समावेश आहे. सध्या हे सैन्यदल देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पुरेसे आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘एनडीए’तील हे प्रशिक्षण देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. अफगाणिस्तानमध्ये देशाच्या सीमा अबाधित राखण्याबरोबरच सैन्यदलाला देशांतर्गत पेचप्रसंगामध्ये भूमिका बजावावी लागत आहे. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचा आमच्या देशातील युवकांना फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.  
जुबैर परतणार काबूलला
तालिबान्यांच्या दहशतवादी कारवायांमध्ये दगावलेले अहमद शाह मसूद या माझ्या काकांकडून मला प्रेरणा मिळाली, असे अहमद जुबैर मसूद याने सांगितले. ‘एनडीए’तील प्रशिक्षणानंतर माझे तीन सहकारी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमध्ये दाखल होणार असले तरी मी मात्र काबूल येथे परतणार आहे. अफगाण मिलिटरी अॅकॅडमीमध्ये एक वर्षांचे प्रशिक्षण घेऊन देशसेवा करणार असल्याचे जुबैर याने सांगितले.