आठवड्यापासून सुरू झालेल्या इंधनाच्या दरवाढीत डिझेलचे दर लिटरमागे सुमारे चार रुपयांनी वाढले आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. डिझेलचे वाढते दर लक्षात घेता येत्या काही दिवसांत माल आणि प्रवासी वाहतूक महागणार असल्याचे संकेत वाहतूकदारांकडून देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंधनाची शेवटची दरवाढ नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती. केंद्र शासनाकडून करण्यात आलेल्या कर कपातीनंतर ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. सुमारे पाच महिने इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, २२ मार्चला इंधनाच्या दरात वाढ सुरू झाली. त्यानंतर दररोजच काही पैशांनी डिझेलसह पेट्रोलच्या दरातही वाढ होत आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास सध्याच्या भाडेदरात वाहतूकदारांना व्यावसाय करणे परवडणार नसल्याचे स्पष्ट करीत वाहतुकीच्या दरवाढीबाबत सुतोवाच करण्यात आले आहे.

चार रुपयांनी डिझेल महागले, प्रवाशांना मोठी झळ बसणार

महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी याबाबत सांगितले की, गेल्या आठवड्याभरात सलग सातव्यांदा डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सुमारे चार रुपयांनी डिझेल महागले आहे. डिझेलच्या दरवाढीच्या प्रमाणात वाहतूकदारांना प्रवासी आणि माल वाहतुकीचे दर मिळत नाहीत. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यातून महागाई वाढणार आहे.

हेही वाचा : Petrol- Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर कडाडले; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांनाच बसण्याची शक्यता आहे. त्यामु‌ळे केंद्र सरकारने देशातील ऑईल कंपन्यांशी चर्चा करून डिझेलचे दर स्थिर ठेवण्याबाबत काही पर्याय शोधावेत. अन्यथा वाहतूकदारांना व्यवसाय करणेच कठीण होईल, असंही बाबा शिंदे यांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger and goods transport may become expensive after fuel price hike pune print news pbs