पुणे-मुंबई दरम्यान दररोजचा प्रवास करणाऱ्यांची लाडकी गाडी असलेल्या ‘डेक्कन क्वीन’सह इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये रेल्वेकडून माहिती-मनोरंजनाचा खजिना प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना मोबाइलच्या माध्यमातून रामायण-महाभारतापासून विविध कथा ऐकता येणार आहेत. त्याचबरोबरीने नव्या अत्याधुनिक जगाशी संवादही साधता येणार आहे. मनोरंजनासह खाद्य, पोशाख तसेच शहराची वैशिष्ट्ये, भ्रमंती, खरेदीची ठिकाणे आदींची माहितीही मिळू शकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेकडून खासगी संस्थेच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, पुणे-मुंबई मार्गावर प्रथमच त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्स्प्रेससह आणखी दहा गाड्यांमध्ये त्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपक्रमात सहभागी होण्याच्या दृष्टीने गाड्यांमध्ये क्यूआर कोड असतील. मोबाइलच्या माध्यमातून हा कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशासाठी माहिती-मनोरंजनासह संवादाचा खजिना खुला होणार आहे. एका प्रवाशाला एकदाच कोड स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर प्रवाशाच्या मोबाइलवर हव्या त्या वेळेला ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.

संकेतस्थळाप्रमाणे असलेल्या या सुविधेत प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नानुसार माहिती किंवा मनोरंजनाचा ठेवा पुरविण्याची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे रामायण-महाभारतासारख्या पौराणिक कथा आणि लोककथाही त्यात उपलब्ध होणार आहेत. आपण जात असलेल्या शहरातील वैशिष्ट्ये, तेथील पर्यटनाची ठिकाणे, खरेदी किंवा चांगल्या भोजनाची ठिकाणेही कळू शकणार आहेत. खेळाची आवड असणाऱ्यांसाठी विविध खेळ किवा सामान्य ज्ञानाच्या माहितीची खजिनाही प्रवाशांना मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे आपण करीत असलेल्या प्रवासाची माहिती, प्रवासादरम्यान येणारी स्थानके, महत्त्वाच्या शहरांतील वैशिष्ट्यांबाबतही प्रवाशांना माहिती मिळू शकणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers of deccan queen indrayani express will get information and entertainment pune print news msr