गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी पालिकेने बक्षीस योजना सुरू केली. त्यानुसार, अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्याचा लाभ झाला आहे. परंतु, अचानक करण्यात आलेल्या एका बदलाने एका गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांचे ‘लाख’मोलाचे नुकसान होत असल्याची माहिती पुढे आली आहे. नगरसेवक तानाजी खाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आयुक्त राजीव जाधव यांनी यात लक्ष घातले.
पिंपरी पालिका माध्यमिक शाळांमध्ये दहावीत ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांला २५ हजार, ८५ टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यास ५० हजार आणि ९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण असल्यास एक लाख रुपये बक्षीस दिले जातात. गुणवंताना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने ही योजना सुरू केली होती. त्यानुसार, अनेकांना लाभही झाला आहे. मात्र, रुपीनगर येथील विद्यार्थी ओंकार बालाजी भंडारे यास दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळाले. त्यानुसार, त्याला पालिकेचे लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने अचानक ९० टक्क्य़ांचा निकष बदलून ९१ टक्के केला. मात्र, त्याची माहिती व कारण कोणालाच माहिती नाही. या बदलामुळे एकमेव भंडारे याचे नुकसान होत आहे. नगरसेवक खाडे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. ओंकारची घरची परिस्थिती नाजूक आहे. त्याला वडील नाहीत, त्याचा सांभाळ मामा करतात. खडतर परिस्थितीत कष्ट करून त्याने यश मिळवले आहे. त्याच्या दृष्टीने हे मोठे नुकसान आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे आणि आयुक्तांची त्यांनी भेट घेतली आणि त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यासंदर्भात, माहिती घेऊन योग्य सुधारणा करू, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे.