पिंपरी : महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या सहा हजार ६४४ गृहनिर्माण सोसायट्यांमधील ७७ हजार ८८६ सदनिकाधारकांकडे १८० कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. या थकबाकीदारांच्या सदनिकांच्या शेअर सर्टिफिकेटवर (समभाग प्रमाणपत्र) महापालिका थकीत रकमेचा बोजा चढविणार आहे. याबाबत गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांना पत्र दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. थकबाकीदारांचे नळजोड खंडित करणे, मालमत्ता लाखबंद (सील) करणे अशा कारवाया सुरू केल्यानंतरही कराचा भरणा केला जात नसल्याचे समोर आले. महापालिका प्रशासनाने चालू आणि थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी सदनिकाधारकांना वेळोवेळी मोबाइलवर संदेश केले.

प्रत्यक्ष संपर्क साधला. थकबाकीदार सदनिकाधारकांची यादी सर्व सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव यांना पाठविली. सोसायट्यांच्या सूचना फलकावर लावली. तरीही थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे थकबाकीदार सदनिकाधारकांच्या शेअर सर्टिफिकेटवर थकबाकीचा बोजा चढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

सर्व गृहनिर्माण संस्था सदनिकाधारकांना शेअर सर्टिफिकेट देते, त्याची एक प्रत आणि नोंदवही सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे असते. त्यामुळे मिळकत कर थकबाकी नोंद सदनिकाधारकांच्या शेअर सर्टिफिकेटवर करण्याची विनंती पदाधिकाऱ्यांना केली आहे. सहकारी संस्था, उपनिबंधकांकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे. यामुळे सदनिका हस्तांतरण करतेवेळी मालमत्ता कर भरल्याशिवाय संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र देता येणार नाही. सदनिका घेणाऱ्यांची फसवणूक होणार नाही.

थकबाकीदार सोसायटीच्या निवडणुकीत मतदानास अपात्र

शहरात सहा हजार ६४४ गृहनिर्माण सोसायट्या नोंदणीकृत आहेत. यामधील ७७ हजार ८८६ सदनिकाधारकांकडे मालमत्ताकर थकीत आहे. ही थकबाकी जमा होण्यासाठी साेसायटी अध्यक्षांना पत्रव्यवहार केला आहे. थकबाकीदार सभासदाला सोसायटी निवडणुकीत मतदानास अपात्र करणे आणि संचालक मंडळावर सभासद होण्यास अपात्र करण्याबाबत सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांकडे महापालिका पत्रव्यवहार करणार आहे.

मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्याचे आवाहन

सदनिकाधारकांनी सदनिकेचा चालू आर्थिक वर्षांचा अथवा थकीत वर्षांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करावा, मोबाइल क्रमांक महापालिका कर संकलन विभागाकडे अद्ययावत असल्याची खात्री करावी. योग्य मोबाइल क्रमांक नसल्यास अद्ययावत करून घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. रहिवासी मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. आर्थिक वर्षाचे केवळ १४ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी ३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc step against defaulters tax burden on share certificates ineligible to vote in society elections pune print news ggy 03 zws