पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या महिला, बालक, विद्यार्थी, अपंग, मागासवर्गीय, तृतीयपंथी आदींच्या कल्याणकारी योजना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एका क्लिकवर सर्व योजना लाभार्थ्यांना समजणार असून, पात्रतेनुसार संबंधित योजनेसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वेबपेजचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त मनोज लोणकर, समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे या वेळी उपस्थित होत्या. समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मदत, सुविधा व लाभ दिले जातात. या सर्व योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना अधिक सुलभतेने उपलब्ध व्हावी, अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व वेग वाढावा, या उद्देशातून नवे वेबपेज तयार करण्यात आले आहे. त्यावर सर्व योजनांची माहिती, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज प्रक्रिया तसेच, विभागाने राबविलेले उपक्रम याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे.

सर्व लाभार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्र लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील या सदरामध्ये समाज विकास विभाग या उपसदरातून नागरिकांना या नव्या वेबपेजला भेट देता येणार आहे. ‘डिजिटल माध्यमातून पारदर्शक व सुलभ प्रशासनास महापालिकेचे प्राधान्य आहे. समाज विकास विभागाच्या सर्व योजना एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्याने अधिकाधिक पात्र नागरिकांना या योजनांचा लाभ मिळेल’, असे उपायुक्त ममता शिंदे यांनी सांगितले.