पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध कामांच्या रस्ते खोदाईसाठी दिलेली १५ मे ची मुदत संपल्यानंतरही शहरातील काही भागात रस्ते खाेदाई सुरू आहे. ही खाेदाई तत्काळ थांबवावी. अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई आणि फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा, शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिला आहे.

महापालिकेने स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, जलनिस्सारण तसेच, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी, नेटवर्किंगच्या खासगी कंपन्या, महावितरण, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) पाइपलाइन, सेवावाहिन्या, केबल टाकण्यासह विविध कामांसाठी शासकीय किंवा निमशासकीय संस्था रस्ते व पदपथ खोदतात. खोदकाम करून भूमिगत सेवावाहिनी किंवा केबल टाकली जाते. खोदकामानंतर व्यवस्थित दुरुस्ती न केल्याने पावसाळ्यात खड्डे पडतात. पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम केल्याने रस्ते खराब होऊन खड्ड्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे १५ मे पर्यंतच महापालिकेने खोदाईला परवानगी दिली होती. त्यानंतर खोदाई करू नये असे आवाहन केले होते. तसे केल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचा इशारा महापालिकेने दिला होता. मात्र, त्यानंतरही खोदाई सुरू आहे.

भोसरीतील लांडेवाडी रस्त्यावर एमआयडीसी चौकात केबल टाकण्यासाठी सोमवारी (१९ मे) पदपथ खोदला आहे. ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तातडीने खाेदाई थांबविली आहे. निगडी ते दापोडी मार्गावर अर्बन स्ट्रीट डिझाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पिंपळेगुरव भागात कृष्णराज कॉलनी व इतर अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण वाहिनीसाठी रस्ते खाेदून ठेवण्यात आले आहेत. रस्ते खोदल्यानंतर त्याठिकाणी सुरक्षा कठडे न लावल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निगडी ते दापोडीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यासाठी बीआरटी मार्ग खोदण्यात आला आहे. खोदकाम करून जलवाहिनी टाकली जात आहे.

खोदाईसाठी दिलेली मुदत संपली आहे. आता केवळ पाणीपुरवठा, विद्युत अशा अत्यावश्यक कामांसाठी खोदकामास परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त कोणालाही परवानगी नाही. खोदकाम केल्यास सुरुवातीला दंडात्मक आणि नंतर फाैजदारी कारवाई करण्यात येईल. खाेदलेले रस्ते, चर बुजविण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.