महापालिकेची तसेच शिक्षण मंडळाच्या शाळांची मैदाने पूर्वीप्रमाणेच खेळाडूंना आणि क्रीडा संघटनांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला आहे. मैदानी आणि देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदाने सवलतीत देणे आवश्यक असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
महापालिकेची मालकी असलेल्या मोकळ्या तसेच बांधलेल्या जागा, क्रीडा संकुले, बाजारांमधील गाळे आदी वास्तू देताना कशा पद्धतीने भाडे आकारणी करावी याची नियमावली महापालिकेने तयार केली आहे. त्यानुसार कोणतीही जागा भाडे तत्त्वावर देताना निविदा काढल्या जातात. प्रचलित बाजारभावाचा विचार भाडे ठरवताना केला जातो. मात्र, बाजारमूल्यानुसार भाडे ठरवले जात असल्यामुळे मोकळ्या मैदानांचे जे भाडे निश्चित होते ते खेळाडूंना परवडण्यासारखे नसते, याकडे नगरसेवक रवींद्र माळवदकर आणि संजय बालगुडे यांनी लक्ष वेधले आहे.
मैदानांचे भाडे निश्चित करताना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव माळवदकर आणि बालगुडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. महापालिकेची तसेच शिक्षण मंडळाच्या शाळांची मैदाने खेळाडूंना सरावासाठी देताना पूर्वी मैदाने सवलतीच्या दरात दिली जात असत. जुन्या शहरात तसेच उपनगरांमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही खेळण्यासाठी मैदानांची कमतरता भासत आहे. मैदानांचे भाडे बाजारमूल्यानुसार आकारले जात असल्यामुळे हे भाडे खेळाडू आणि क्रीडा संघटनांना परवडत नाही. त्यामुळे देशी आणि मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच सवलतीच्या दरात मैदाने द्यावीत, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
महापालिका शाळांच्या वर्गखोल्या अनेकविध चांगल्या उपक्रमांसाठी पूर्वी शाळा सुटल्यानंतर दिल्या जात असत. त्यामुळे चांगले उपक्रम आयोजित करणे शक्य होत असे. ती पद्धतही आता बंद करण्यात आली असून पूर्वीप्रमाणेच वर्ग देण्याची कार्यवाही सुरू करावी, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2014 रोजी प्रकाशित
महापालिकेची मैदाने खेळाडूंना सवलतीत द्या
मैदानांचे भाडे बाजारमूल्यानुसार आकारले जात असल्यामुळे हे भाडे खेळाडू आणि क्रीडा संघटनांना परवडत नाही. त्यामुळे देशी आणि मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच सवलतीच्या दरात मैदाने द्यावीत.

First published on: 26-07-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc sport ground fare standing committee