दौंड येथे दरोडा टाकून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांवर घरातील नागरिकाने केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला. पळून गेलेले दरोडेखोर घराच्या पाठीमागील उसाच्या शेतात शिरल्यानंतर पोलीस आणि नागरिकांनी शेताला वेढा टाकून ऊस तोडला. त्यामध्ये जखमी दरोडेखोरासह दोघे जण पोलिसांना सापडले. दौंड येथील शिवराजनगर येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली.
बाळू ज्ञानसिंग भिल्ल (वय २२, रा. भोपाळ) असे गोळीबारात जखमी झालेल्या दरोडेखोराचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर, राजीव राजेश पवार (वय ४५, रा. भोपाळ) या दरोडेखोरास अटक करण्यात आली आहे. बाकीचे पाच दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, अशी माहिती दौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयाराम शिंदे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील शिवराजनगर येथे गिरजा बापू पवार यांच्या घरावर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पवार यांना दरोडेखोरांनी धमकावून त्यांच्याजवळील मोबाईल, घडय़ाळ काढून घेतले. इतर ऐवज देण्याची मागणी करू लागले. पवार यांनी नकार दिल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने वार केला. त्यात ते जखमी झाले आणि आपला जीव वाचविण्यासाठी घरात असलेली परवानाधारक छऱ्याची रायफल काढली. एका दरोडेखोरावर गोळी झाडली. यामध्ये दरोडेखोर जखमी झाल्यानंतर सर्व जण पळून घरामागील उसाच्या शेतात शिरले. त्याच वेळी घराजवळून गस्तीवरील पोलिसांची मोटार जात होती. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले. नागरिक आणि साठ पोलिसांनी ऊसाच्या शेताला वेढा टाकला. सुरुवातीला ऊस पेटवून देण्यात आला. पण, ऊस पेटत नसल्यामुळे कारखान्यावरून ऊस तोडणी करण्यास कामगारांना बोलविले. पहाटेच उसाची तोडणी सुरु केली. त्यावेळी पहाटे पाच वाजता भिल्ल हा जखमी अवस्थेत सापडला. त्यानंतर सकाळी दहा वाजता पवार सापडला. ऊसाचे शेत तोडल्यानंतरही इतर पाच दरोडेखोर मिळालेले नाहीत. ते पहाटेच पळून गेले असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दयाराम शिंदे हे अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police crime sugarcane loot arrested