तीन दिवसांत ३४४ वाहनचालकांवर कारवाई
पुणे : भरधाव वाहन चालविणे तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवून गंभीर स्वरुपाच्या अपघातांना निमंत्रण देणाऱ्या दुचाकीस्वार तसेच मोटारचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बेशिस्त वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली असून गेल्या तीन दिवसांत ३४४ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
वाहतुकीच्या नियमांचा भंग करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे (नो एंट्री), भरधाव वाहन चालवून गंभीर स्वरुपाच्या अपघातांना निमंत्रण देणे अशा प्रकारच्या नियमभंगामुळे वाहनचालक स्वत:च्या तसेच दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण करतो. बेदरकार वाहनचालकांना चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी वाहतूक पोलिसांना कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारच्या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना जरब बसेल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.
वाहतुकीचे नियम पाळा, पादचारी पट्टयांवर (झेब्रा क्रॉसिंग) वाहने उभी करु नका, भरधाव वाहने चालवू नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी मोहीम राबविली. मात्र, गेल्या काही दिवसांत भरधाव वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी भादंवि २७९ नुसार थेट दखलपात्र गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी ३३४ जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे देशमुख यांनी नमूद केले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय?
भरधाव वाहन चालविणे तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर भारतीय दंड विधान २७९ नुसार (स्वत:च्या तसेच दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण करणे) गुन्हे दाखल करण्यात येतात. अशा प्रकरणात वाहतूक पोलिसांकडून ज्या भागात नियमभंग झाला असेल त्या पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात येते. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संबंधित वाहनचालकाला अटक करण्यात येते. त्यानंतर न्यायालयाकडून त्याला जामीन मिळवण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. भादंवि २७९ कलमानुसार दाखल झालेला गुन्हा दखलपात्र स्वरुपाचा आहे. त्यामुळे भविष्यात पारपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र मिळवण्यास अडचण निर्माण होते. अनेक खासगी कंपन्यांत नोकरी मिळवण्यासाठी उच्चशिक्षित युवकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (कॅरेक्टर व्हेरिफिकेशन) सादर करावे लागते.
यंदा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत भादंवि २७९ नुसार शहरातील २३०० वाहनचालकांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, याबाबत पोलिसांनी वेळोवेळी आवाहन केले आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा