पुणे विद्यापीठामध्ये या शैक्षणिक वर्षांपासून ‘योग’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून या निर्णयाला विद्यापरिषदेने बुधवारी मान्यता दिली. विद्यापीठाच्या आवारात समाजकार्य अभ्यासक्रम विभागही सुरू करण्यात येणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक बुधवारी झाली. या बैठकीमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या अनेक अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. या वर्षीपासून विद्यापीठामध्ये ‘योग शिक्षण’ या विषयातील शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड) आणि ‘योग’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए) सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांना विद्यापरिषदेने बुधवारी मान्यता दिली. योगशिक्षण विषयातील डीएड अभ्यासक्रमासाठी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, तर एम.ए योग या अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या आवारात समाजकार्य अभ्यासक्रम विभागही सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या विभागांतर्गत समाजकार्य विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.एस.डब्लू.) या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. औषधनिर्माण शास्त्रातील पदविका अभ्यासक्रमालाही (डी.फार्म) विद्यापरिषदेने मान्यता दिली.
या शैक्षणिक वर्षांपासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मूल्यमापनासाठी क्रेडिट सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयालाही विद्यापरिषदेने संमती दिली असून क्रेडिट सिस्टिमच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post graduate course in yoga at pune university