सकल कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या उत्सवामध्ये कलाकारांवरही दुष्काळाची छाया पडली आहे. राज्य सरकारमधील खांदेपालट, राज्यातील दुष्काळाची स्थिती, जागतिक मंदी, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि दूध संघ यांची नाजूक अवस्था याबरोबरच जागतिक मंदी आणि महागाईने ग्रासलेली सर्वसामान्य जनता या कारणांमुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कलाकारांना बेगमी करण्याची संधी उपलब्ध होऊ शकलेली नाही.
पुणे हे संस्कृतीचे माहेरघर असल्याने येथील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आकर्षण असते. गणेशोत्सवामध्ये कलाकारांना सातत्याने मागणी असते. ऑर्केस्ट्रा, तमाशा, जादूचे प्रयोग, नाटक, नृत्याविष्कार याबरोबरीनेच एकपात्री कलाकारांनाही सुगीचे दिवस असतात. मात्र, यंदाच्या उत्सवावर दुष्काळाची छाया आहे. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम होत असले तरी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत असताना सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देणाऱ्या गणेश मंडळांनी यंदा दुष्काळामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना कात्री लावली आहे. त्याचा फटका कलाकारांना बसला आहे.
पुण्यातील कलाकारांना दरवर्षी विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये मागणी असते. मात्र, हे दोन्ही विभाग यंदा दुष्काळाने ग्रासले आहेत. साखर कारखाने दरवर्षी गणेशोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, यंदा शेतकऱ्यांनाच किमान दर देता येत नाही अशी परिस्थिती असल्याने साखर कारखान्यांनीही गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला आहे. लावणी, ऑर्केस्ट्रा आणि नाटक या कलाप्रकारांना मागणी घटली आहे. हीच परिस्थिती दूध संघ आणि सहकारी सूतगिरण्यांची आहे, अशी माहिती संवाद संस्थेचे सुनील महाजन यांनी दिली.
दुष्काळामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये केवळ कमी बजेटमधील कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे एकपात्री कलाकारांनाच मागणी आहे. काही गणेश मंडळे आणि सोसायटी गणेशोत्सव मंडळांनी दुष्काळासाठी निधी देण्याचे ठरविले असल्यामुळे त्याचा फटका ऑर्केस्ट्रा आणि मराठी भावगीतांच्या कार्यक्रमांना बसला आहे, याकडे प्रसिद्ध निवेदक आणि एकपात्री कलाकार सुधीर गाडगीळ यांनी लक्ष वेधले.
गणेशोत्सव हा नाटक, ऑर्केस्ट्रा, लावणी, एकपात्री आणि जादूचे प्रयोग अशा सर्व प्रकारच्या कलाविष्कारातून रसिकांना आनंद देणाऱ्या कलाकारांसाठी वर्षभराची बेगमी करण्यासाठीचा कालखंड असतो. यंदाच्या वर्षी दुष्काळाचा फटका सांस्कृतिक कार्यक्रमांना बसला आहे. दरवर्षी कलाकारांच्या आणि कार्यक्रमांच्या तारखांचे आगाऊ ‘बुकिंग’ केले जाते. यंदा कार्यक्रमांचे बजेट कमी केले असले तरी तेवढी रक्कम देण्याची मंडळांची मानसिकता नाही. त्यामुळे कलांचा अधिपती असलेल्या गणेशोत्सवामध्येच कलाकारांवर बसून राहण्याची वेळ आली आहे, असे मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी सांगितले.
बदललेल्या राजवटीचाही कलाकारांना फटका
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाले. यंदाच्या वर्षी दुष्काळाचा फटका बसला असून त्याचे परिणाम गणेशोत्सवामध्येही दिसून येत आहेत. ज्या नेत्यांकडे पैसे खर्च करण्याची ऐपत आहे, तेसुद्धा दुष्काळामुळे पैसे द्यायला तयार नाहीत. यापूर्वी दुष्काळ असला तरी त्याचा फटका गणेशोत्सवाला कधी बसला नाही. मात्र, गणेशोत्सवामध्ये पैसे खर्च केल्यास दुष्काळ असतानाही खर्च केल्याची टीका सहन करावी लागेल, या जाणिवेतून गणेशोत्सवावर मंदीचे सावट पसरले आहे, याकडे एका सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर लक्ष वेधले.