पाश्चात्त्य संगीताविषयी इत्थंभूत माहिती देत आपल्याशी संवाद साधणाऱ्या ‘लयपश्चिमा’ या पुस्तकातून मित्रत्वाचा सूर जपला आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केले. एकमेकांशी संवाद साधण्याचा सराव हरवता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
राजहंस प्रकाशनतर्फे युवा संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.  ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाश्चात्त्य संगीताची माहिती देणाऱ्या ‘लयपश्चिमा’ या सदरातील लेख विस्ताररूपाने या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे या वेळी उपस्थित होते.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या,‘आता वेगवेगळ्या माध्यमातून पाश्चात्य संगीत आपल्यावर बरसत असते. त्या संगीताची, ते सादरीकरण करणाऱ्या माणसांची वैशिष्टय़े आपल्याला जाणवत नाहीत. माझ्या संगीत श्रवणाच्या कक्षा रुंदावलेल्या नाहीत. माहीत असलेली आणि पुन्हा पुन्हा एकावीशी वाटणारी गीतेच मी ऐकते. त्यामुळे सध्याच्या श्वासही घेण्यासाठी न थांबणाऱ्या काळामध्ये अशा विषयावर माहितीपर पुस्तक येणे महत्त्वाचे आहे. आशुतोषच्या लेखनामध्ये प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास आहे. या संवादातून त्याने मित्रत्वाचा सूर जपला आहे.’
पाश्चात्त्य संगीत हे खरंच परकं राहिलयं का? तर, ते आपल्याकडेही आलंय. त्याची केवळ नोंद घेण्यापेक्षा अभ्यासपूर्ण मांडणी करावी हेच या लेखनामागचे प्रयोजन असल्याचे सांगत आशुतोष जावडेकर यांनी, संगीताकडे मी सामाजिक नजरेने पाहतो, असे सांगितले. पाश्चात्त्य संगीत ऐकताना कानामध्ये बोळे घालू नयेत ही जाणीव या पुस्तकाने करून दिल्याचे बोरसे यांनी सांगितले. हृत्विक गजेंद्रगडकर आणि मुक्ता ढेरे यांनी सूत्रसंचालन केले.

पश्चिमेच्या लयीची सफर
देशी संगीताची अनुभूती देणारे कंट्री संगीत, केवळ गिटारीच्या साथीने गायलेले ‘बटरफ्लाय फ्लाय अवे’, रॉक संगीताची प्रचिती देणारे ‘ल्यू सी इन द स्काय विथ डायमंडस’, ए. आर. रेहमानचे संगीत असलेले ‘नादान पिरदे’ हे गीत, स्पॅनिश भाषेचा गोडवा अनुभवणारे गीत, पीटर मार्टिन आणि शाकिरा यांची गीते अशी आशुतोष जावडेकर यांनी पश्चिमेच्या लयीची सफर श्रोत्यांना घडविली.