भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी गानवर्धन संस्थेच्या व्यासपीठावर मुक्त संगीत चर्चासत्रामध्ये मांडलेले विचारधन ‘मॅस्ट्रोज स्पीक’ या नावाने इंग्रजीमध्ये आले आहे. ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज यांच्या हस्ते शुक्रवारी (२ ऑक्टोबर) या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, पं. सी. आर. व्यास, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्यासह ४५ दिग्गज कलाकारांचे विचारधन एकत्रितपणे अनुभवण्याची संधी संगीत जाणकारांना आणि अभ्यासकांना मिळणार आहे. अभिजात संगीताच्या प्रचारासाठी गेली ३७ वर्षे कार्यरत असलेल्या गानवर्धन संस्थेतर्फे १९८२ पासून सातत्याने होत असलेल्या ‘मुक्त संगीत चर्चासत्र’ या उपक्रमातील भाषणांवर आधारित हा ग्रंथ आहे. ज्येष्ठ संगीत समीक्षक डॉ. श्रीरंग संगोराम संपादित ‘मुक्त संगीत संवाद’ आणि ‘संगीतज्ञों का विचारधन’ या मूळ ग्रंथांवर आधारित हे इंग्रजी भाषांतर आहे. जगभरातील संगीतप्रेमींना भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल असणारे कुतूहल आणि आकर्षण ध्यानात घेऊन संस्थेने हे विचारधन इंग्रजीत प्रकाशित करण्याचे ठरविले. या ग्रंथाचे संपादन आणि अनुवाद ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारुलकर यांनी, तर सहसंपादन शोभना गदो-कुलकणी यांनी केले आहे. संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांच्या सहस्रचंद्रदर्शनपूर्तीचे औचित्य साधून हा प्रकाशन कार्यक्रम होत आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना हा ग्रंथ समर्पित केला जाणार आहे. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती गानवर्धन संस्थेचे विश्वस्त प्रसाद भडसावळे यांनी दिली.