पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. रविवारी तीनही मुलं हे शिगणेवाडी गावातील मीना नदीपात्रात पोहण्यास गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. पण आज(दि.३०) सकाळी तिघांचे मृतदेह मिळाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रणव राजेंद्र वाव्हळ (वय-१६), वैभव चिंतामण वाव्हळ (वय-१५), श्रेयस सुधीर वाव्हळ (वय-१५) अशी घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. वैभव, प्रणव आणि श्रेयस तिघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. रविवारी सुट्टी असल्याने तिघंही नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. मात्र, हा आनंद त्यांच्या जीवावर बेतला. तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
गोविंद वाव्हळ हे रविवारी साडेसहाच्या सुमारास नदीकाठी फिरण्यासाठी गेले असता, त्यांना तेथे सायकल आणि कपडे दिसले. यावरून मयत प्रणवचे चुलते महेंद्र यांना गोविंद यांनी फोन करून माहिती दिली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी येऊन तिघांचा नदीमध्ये शोधही घेतला. मात्र ते सापडले नाहीत, अखेर आज सकाळी एनडीआरएफच्या जवानांनी तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत असून परिवारावर शोककळा पसरली आहे.