भारतीय जनता पक्षाची यंदाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात पार पडली. मात्र, दीड महिन्यांनंतरही त्याचे भाडे भाजपकडून भरण्यात आले नसल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. या बैठकीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, जेमतेम ७० हजार रुपयांचे भाडे भरण्यासाठी भाजप नेत्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरात चर्चेची ठरलेली भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक २६ आणि २७ एप्रिलला चिंचवड नाटय़गृहात पार पडली. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार-खासदार, पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी अशा भाजपच्या दिग्गजांनी या बैठकीसाठी हजेरी लावली होती. बैठकीच्या आधीचा एक दिवस तयारीसाठी आणि प्रत्यक्ष बैठकीचे दोन दिवस असे एकूण तीन दिवस नाटय़गृह भाजपसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. या संदर्भात, भाजपच्या पालिकेतील एका पदाधिकाऱ्याचे लेखी पत्र नाटय़गृह प्रशासनाला देण्यात आले होते. आठवडाभर आधी कार्यक्रमाचे भाडे जमा करायचे, हा इतरांसाठी असलेला नियम सत्ताधारी भाजपला लावण्यात आला नव्हता. त्यामुळे पैसे न भरताच नाटय़गृहाचा ताबा भाजप नेत्यांकडे देण्यात आला होता. ओळखीचे संयोजक असल्यास अथवा भाडे भरले जाईल, याची खात्री असल्यास कार्यक्रमानंतर किमान सात दिवसांनी भाडे भरण्याची मुभा दिली जाते. मात्र, दीड महिन्याहून अधिक कालावधी लोटला तरी नाटय़गृहाचे भाडे भरण्यात आले नव्हते.

भाडय़ापोटी ६० हजार आणि विजेचे बिल १० हजार असे मिळून ७० हजाराचे भाडे मिळावे म्हणून नाटय़गृहाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ज्या नेत्याने नाटय़गृह आरक्षित ठेवण्यासाठी पत्र दिले होते, त्यास पत्र पाठवून थकित भाडय़ाविषयी ‘स्मरण’ करून देण्यात आले. मात्र, त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. भाजपचा एक ‘धडाडीचा’ नगरसेवक आणि एक ‘कार्यतत्पर’ सरचिटणीस यांच्यावर भाडे भरण्याची जबाबदारी होती. मात्र, त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसल्याचे दिसून येते. या बैठकीच्या निमित्ताने शहर भाजपने जोरदार वातावरणनिर्मिती व शक्तिप्रदर्शन केले होते. यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्चही करण्यात आला. शहरभरातील होìडग, वर्तमानपत्र तसेच वाहिन्यांवर दिलेल्या जाहिराती, पाहुण्यांसाठी महागडी हॉटेल्स, जेवणाचा खर्च आदींसाठी करण्यात आलेला खर्च नजरेत भरण्यासारखा होता. एकीकडे, असे असताना ज्या वास्तूत ही बैठक संपन्न झाली, त्या नाटय़गृहाचे जेमतेम ७० हजाराचे भाडे मात्र थकवण्यात आले आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bjp not paid 70 thousand rent of ramkrishna more auditorium
First published on: 12-06-2017 at 01:01 IST