उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पुणे जिल्ह्य़ातील भामा-आसखेड आणि आंद्र धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवातही करण्यात आली. दोन्ही धरणांमधून मिळून एकूण ४ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी उजनी धरणात पोहोचण्यास ७ ते १० दिवसांनंतर सुरुवात होईल.
सोलापूर जिल्हा व खालच्या बाजूला असलेल्या इतर दुष्काळी भागासाठी २४ तासांत पाणी सोडावे, असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला होता. त्यानुसार मुंबईत बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्य़ातील भामा-आसखेड धरणातून ३ टीएमसी, तर आंद्र धरणातून १ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी नदीवाटेच सोडावे लागणार आहे. याबाबत मुख्य अभियंता अविनाश सुर्वे आणि सी. ए. बिराजदार यांनी सांगितले की, भामा-आसखेडपासून उजनीचे अंतर २०४ किलोमीटर आहे, तर आंद्र धरणापासून हेच अंतर सुमारे २२४ किलोमीटर आहे. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर ते उजनी धरणाच्या जलाशयात पोहोचण्यास सुमारे ७ ते १० दिवसांनंतर सुरुवात होईल. संपूर्ण पाणी पोहोचण्यास सुमारे ४० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. सोडलेल्या पाण्यापैकी किती पाणी उजनीत पोहोचेल, याबाबत पुढील काही दिवसांत नेमकेपणाने सांगता येईल. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार दीड ते पावणे दोन टीएमसी पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. या दोन्ही धरणांच्या मर्यादा पाहता हे पाणी फार जास्त वेगाने सोडता येणार नाही. त्यामुळे भामा-आसखेडमधून जास्तीत जास्त एक हजार घनफूट प्रति सेकंद (क्युसेक), तर आंद्र धरणातून २५० घनफूट प्रति सेकंद या वेगाने पाणी सोडता येईल. त्यामुळे हे पाणी एकदम न सोडता जास्त काळ सोडावे लागणार आहे. सोडलेल्या पाण्यापैकी जास्तीत जास्त पाणी पोहोचावे यासाठी मधल्या भागातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.