-सागर कासार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील चार महिन्यापासून करोना विषाणूमुळे बाजारपेठ ठप्प झाल्याने, लाखो लोकांच्या हाताला काम नाही. तर अनेकांच्या हाताचा रोजगार देखील गेला आहे. त्याच दरम्यान काही दिवसापूर्वी एक आवड म्हणून, बेकरी प्रोडक्टचा कोर्स पुण्यातील उच्चशिक्षित प्रिया राजेश शिरसकर या तरुणीने केला होता. हाच कोर्स लॉकडाउनच्या काळात घरातील आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी फायदेशीर ठरला असून तिने आजअखेर 150 हून अधिक केकची विक्री केली आहे. तिने आपल्या छोट्याशा घरातून एवढ्या कठीण काळात सुरू केलेल्या, व्यवसायाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रिया राजेश शिरसकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, “माझं एमबीएच शिक्षण झाले असून मी एका ऑफिसमध्ये कामाला होते. पण आईच्या सततच्या आजारपणामुळे कामावर जाणे शक्य होत नव्हते. त्यात आईला शुगरच्या त्रासामुळे, तिची नजर गेली. यामुळे तिला कायमच अंधत्व आले आहे. आता घरातील काम आणि आईकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर मी घरी थांबण्याचा निर्णय घेतला. घराच्या कामातून थोडा वेळ मिळत होता. तेव्हा मी बेकरी प्रोडक्टचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णही केला. त्यानंतर मी घरी केकचे अनेक पदार्थ तयार करीत होते. पण आपण केकचा पुढे जाऊन व्यवसाय करावा असे कधी मनात आणले नव्हते. पण आपल्या सर्वांचे सर्व ठिकठाक सुरू असताना, करोनाच संकट आले. यामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. तर काम बंद झाले आहे. अशीच परिस्थिती माझ्या घरात देखील मी पाहिली. माझे बाबा एका ऑफिसमध्ये कामाला, तर भाऊ मॉलमध्ये कामास होता. त्या दोघांचे करोनामुळे काम बंदच झाले. यामुळे आम्हाला रोजच जगणे खूप मुश्किल झाले होते. तेव्हा आपण तर बेकरी प्रॉडक्टचा कोर्स केला आहे आणि काही पदार्थ तर, यापुर्वी देखील तयार केले आहे. केकच्या ऑर्डर घेऊयात, याबाबत बाबा आणि आई सोबत बोलणे झाले. त्यावर त्यांनी मला परवानगी दिली. दुसर्‍या दिवसापासुन माझ्या कामास सुरुवात झाली. केकच्या व्यवसायासाठी खूप साहित्य आणि वस्तु लागतात. लॉक डाऊनच्या काळात ते मिळविणे सुरुवातीला कठीण गेले. पण बाबानी माझ्यासाठी अनेक ठिकाणी जाऊन वस्तु आणल्या. मी सुरुवातीला कप केक, चॉकलेट तयार केले. त्यानंतर अर्धा आणि एक किलोच्या हळूहळू ऑर्डर मिळत गेल्या. तसेच एक केक पूर्ण होण्यासाठी साधारण 4 तासाचा कालावधी लागतो. केक तयार करण्यासाठी मायक्रोव्हेचे पाहिजेच. त्याशिवाय केक होऊ शकत नाही आणि तो माझ्याकडे नव्हता. त्यावर उपाय म्हणून, एका मोठ्या भांड्यात केक ठेवून गॅसवर उष्णता देऊन, काही दिवस केक तयार केले. त्यावेळी अनेक वेळा चटके देखील बसले. या चार महिन्यात खूप कष्ट घेतल्याने, आतापर्यंत 150 हून अधिक आमच्या परिसरातील केकच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या पैशातून मी आता नवीन मायक्रोव्हे घेतला असून आता काम अधिक सोपे झाले आहे. तर या प्रत्येक कामात आई, बाबा आणि दादा यांनी मदत केल्याने करू शकले आहे. आता हाच व्यवसाय पुढे घेऊन जाणार”, असे  त्यांनी सांगितले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, या करोनामुळे आपला जॉब गेला आहे. हाताला रोजगार नाही. त्यामुळे नैराश्यात जाऊ नका, चुकीचे पाऊल उचलू नका, आपल्या प्रत्येकात असलेल्या कलागुणांना वाव द्या आणि नव्याने कामाला सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

माझी लेक आमच्या कुटुंबाची एवढ्या कठीण काळात आधार बनली : राजेश शिरसकर

“करोनामुळे माझं आणि मुलाचे काम थांबले. यामुळे आमच जगणं कठीण झालं होतं. पण तिने काही दिवसांपूर्वी बेकरी प्रोडक्टचा केलेला कोर्स आमच्या घराला हातभार लावण्यासाठी, या काळात महत्वाचा ठरला . आता ऑर्डर वाढत असून लोकांचा प्रतिसाद पाहून, आता याच व्यवसायात तिने पुढे जावे, असे मला वाटत आहे. तसेच मुले मोठी झाल्यावर आपला आधार बनतात, हे आजवर ऐकले होते. पण माझी लेक खर्‍या अर्थाने आमच्या कुटुंबाची एवढ्या कठीण काळात आधार बनली”. हे सांगत असताना तिचे बाबा राजेश शिरसकर यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

स्वतः च्या पायावर मुलगी उभा राहिल्याने आनंदी : मंदाकिनी शिरसकर

“मला मागील काही वर्षांपासून शुगरचा त्रास असल्याने, त्यावर उपचार सुरू आहे. या आजारामुळे माझी दृष्टी गेली आणि मला कायमचे अंधत्व आले आहे. यामुळे आता पुढे कसे होणार, दोन्ही मुले लहान आहेत. पण माझ्या मुलीने एका ठिकाणी ऑफिसमधील काम सांभाळून, घरातील देखील करीत राहीली. माझ्या आजारपणामुळे तिला काम थांबवावे लागले. मात्र तिला केक तयार करण्याची आवड असल्याने, त्याचा कोर्स देखील त्याच दरम्यान तिने केला. हाच कोर्स आम्हाला लॉक डाऊनच्या काळात घराला हातभार लावण्यास फायदेशीर ठरला. हे केवळ प्रियाच्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर शक्य झाले आहे. स्वतः च्या पायावर ती उभी राहिल्याने खूप आनंदी आहे. पण हे मला पाहता आले असते, तर अधिक आनंद झाला असता”, अशी भावना प्रियाची आई मंदाकिनी शिरसकर यांनी व्यक्त केली.

गो करोनाचा केक कापून सेलिब्रेशन :-

ज्या करोनामुळे लाखो नागरिकांचे काम गेले. त्याच दरम्यान पुण्यातील प्रिया शिरसकर हिने केकच्या व्यवसायाला सुरुवात केली. तिला काही दिवसातच चांगला प्रतिसाद मिळाल्याने, घर चालविण्यास मदत झाली आहे. या तरुणीच्या व्यवसायाचे नागरिकांकडून कौतुक होत असून त्या पार्श्वभूमीवर केकवर करोनाचा लोगो, मास्क आणि सॅनिटायझर बॉटल तसेच गो करोना लिहीत. केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune girl sold more than 150 handmade cakes for survival of family svk 88 sas