हिरव्या बोलीचे निसर्गकवी आणि दुष्काळाचे दाहक वास्तव काव्यातून मांडणारे ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर आगामी ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील अशा हालचाली पडद्यामागून सुरू झाल्या आहेत. विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महानोर यांची निवड झाली असली तरी विविध कारणांनी सलग दोन वर्षे हे संमेलन रद्द होत आहे. त्यामुळे महानोर यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर राखून त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रदान करण्यासंबंधात गांभीर्याने विचार सुरू झाला आहे.

यापूर्वी पुण्यामध्ये झालेल्या ८३ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महानोर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, संमेलनाचे अध्यक्षपद हे सन्मानाचे पद असून ते सन्मानानेच दिले जावे, अशी भूमिका घेत महानोर यांनी अध्यक्षपदासाठी आपले नाव सुचविणारा अर्ज दाखल करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेमुळे अनेक ज्येष्ठ साहित्यिक या सन्मानाच्या पदापासून दूर राहिले आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. साहित्य महामंडळाने दोन वर्षांपूर्वी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महानोर यांची निवड केली. मात्र आधी टोरॅण्टो आणि नंतर लंडन येथील विश्व साहित्य संमेलन रद्द झाले. आता साहित्य महामंडळाच्या घटनादुरुस्तीला धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळाल्याखेरीज विश्व साहित्य संमेलनाला राज्य सरकार २५ लाख रुपयांचे अनुदान देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विश्व साहित्य संमेलन केव्हा होईल याविषयी साशंकता असल्याने महानोर यांच्या अध्यक्षपदाचे काय हा प्रश्न साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे.  आता ८७ वे संमेलन पुण्याजवळील सासवड येथे म्हणजेच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या जिल्ह्य़ात होणार ही केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे.