Maharashtra Board SSC Result 2022 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन जाहीर झाला असून राज्याचा ९६.९४ टक्के इतका निकाल लागला आहे. पुण्यातील भवानी पेठेत राहणारा आणि रमणबाग शाळेतील शुभम राहुल जाधव या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये सर्व विषयामध्ये ३५ गुण मिळाले आहे. या सर्व गुणांची टक्केवारी ३५ टक्के इतकी आहे. या विद्यार्थीचे मार्क सोशल मीडियावर व्हायरल होताच, तेथील नागरिकांनी पुणेरी पगडी आणि पेढे देऊन शुभमचे अभिनंदन केले.

आता मला पोलीस व्हायचयं

माझ्या घरची हलकाची परिस्थिती असून वडील पाण्याच्या टाक्या दुरुस्तीच करतात.तर आई धुणीभांडी करण्याच काम करते. माझ्या दहावीच्या शिक्षणाचा खर्च आई वडीलांवर नको म्हणून, मी हार्डवेअरच्या दुकानात काम करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार मागील वर्षभर शाळा आणि काम करून दहावीची परीक्षा दिली. त्या कामातून महिन्याला ६ हजार पगार मिळतो. यामधून घराला थोडासा हातभार लागत आला आहे.तर त्याच दरम्यान आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार होता. त्यानुसार मी १ वाजता निकाल पहिला तर त्यामध्ये ३५ टक्के पडले असल्याचे दिसले. माझा नंबर टाईप करताना काही चूक झाली का असे वाटले. पुन्हा मित्राच्या मोबाईलमध्ये टाइप केल्यावर ३५ टक्के दिसून आले.मग खात्री झाली की, मला ३५ टक्के पडले. या मार्कची माहिती आई वडीलांना दिली.दोघांना देखील खूप आनंद झाला आहे.पण मला या परीक्षेत ५० ते ५५ टक्के मिळतील असा अंदाज होता.मला कामामुळे मार्क कमी पडले असून ९ वीमध्ये ६७ टक्के होते.पण आता बारावीमध्ये ५० टक्या पेक्षा अधिक पडायचे आहेत आणि पोलीस व्हायचे स्वप्नं असल्याचे शुभम जाधव याने लोकसत्ता डॉट कॉमसोबत बोलून दाखवले.

शुभमचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार

मी दुपारी कामावर असताना शुभमचा फोन आला की, दहावीच्या परीक्षेत ३५ टक्के पडले आहेत. मला त्याच्या फोनवर विश्वास बसला नाही. शुभमला ९ वीमध्ये ३५ टक्के होते. त्यामुळे त्याला त्यापेक्षा अधिक टक्के मिळतील,असे वाटत होते. पण घरची परिस्थिती नसल्यामुळे तो कामावर जात होता. त्यामुळे अभ्यास कमी झाल्याने त्याला ३५ टक्के पडले आहेत. एवढ काम करून तो पास झाला आहे.त्याबद्दल मला आनंद आहे.आता पुढील शिक्षण घेऊन परीक्षेत चांगले मार्क घ्यावेत आणि पोलीस होण्याच स्वप्नं पूर्ण करावे. आम्ही त्याचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शुभमचे वडील राहुल जाधव यांनी सांगितले.