‘महावितरण’ ने ‘गो-ग्रीन’ या योजनेअंतर्गत सर्व लघुदाब ग्राहकांना छापील वीजबिलाऐवजी ई-मेलद्वारे वीजबिले देण्याचा पर्याय दिला असून, पुणेकर ग्राहकांचा या योजनेला सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ई-बिलाचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना वीजबिलामध्ये तीन रुपयांची सूटही देण्यात येत आहे.
ग्राहकसेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर ‘महावितरण’कडून भर देण्यात येत असून, त्यानुसार काही दिवसांपूर्वी वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. घरबसल्या कोणत्याही ठिकाणाहून वीजबिलाचा भरणा करता येत असल्याने या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा एक भाग म्हणून आता ई-मेलद्वारे वीजबिल पाठविण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. कागदनिर्मितीसाठी होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व पेपरलेस कार्यालयाच्या संकल्पनेनुसार ही योजना राबविण्यात येत आहे.
ई-बिलाचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना छापील बिल पाठविले जाणार नाही. त्याचबरोबर त्यांना तीन रुपयांची सूटही दिली जाणार आहे. ‘महावितरण’च्या http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर गेल्यास गो-ग्रीन या रकान्यात ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट क्रमांकाची माहिती भरून ‘सबमिट’ केल्यास दुसरे पान खुले होईल. त्यात ग्राहकाचे नाव व पत्ता दर्शविलेला असेल. या पानावरील एका रकान्यात १५ अंकी गो-ग्रीन क्रमांक व दुसऱ्या रकान्यात ई-मेल भरावा. (गो-ग्रीनचा क्रमांक सध्या सर्व ग्राहकांच्या छापील वीजबिलांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.) यानंतर ई-मेलवर वीजबिल मिळण्याच्या योजनेत संबंधित ग्राहकाचा समावेश करण्यात येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punekar responded for electricity bill by e mail bill