इतरांची लग्नं लावणाऱ्या ‘गुरुजीं’ना लग्नासाठी मुली मिळत नाहीत हे वास्तव असले, तरी ते बदलू लागले आहे. पुण्यात गेल्याच आठवडय़ात खास गुरुजींसाठी भरविण्यात आलेल्या विवाह मेळाव्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मुलींच्या पालकांकडून विचारणा होऊ लागली आहे. त्यामुळे गुरुजींसाठी काम करणारी संस्था आणि लग्न रखडलेल्या गुरुजींसाठी आशेचा किरण दिसू लागल्याचे वातावरण आहे.
मुलींच्या शिक्षणाचे वाढलेले प्रमाण, बदललेल्या संकल्पना यामुळे पौरोहित्य करणाऱ्यांचा लग्नाच्या बाजारातील भाव घटला आहे. त्यामुळे त्यांची लग्नं न जुळणे ही बऱ्याच वर्षांपासूनची समस्या आहे. पुण्यातील ‘श्री सद्गुरू ग्रुप’ या संस्थेतर्फे पौरोहित्य करणाऱ्या राज्यभरातील गुरुजींसाठी हा मेळावा आयोजित केला होता. त्यात राज्याच्या सर्व भागांतून तसेच, गोवा, बलसाड, बेळगाव या भागांतून विवाहेच्छुक गुरुजी आले होते. २२ ते ४८ वर्षे वयोगटातील एकूण सहाशेपेक्षा जास्त जण त्यात सहभागी झाले होते. त्यांच्याशी लग्नाला इच्छुक असणाऱ्या मुलींची संख्या केवळ ४२ इतकी होती. मात्र, मुलींचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांची संख्या १४० पेक्षा जास्त होती. आतापर्यंतचा अनुभव पाहता इतक्या पालकांचा सहभाग ही सकारात्मक बाब आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यानंतर मुलींच्या पालकांकडून मोठय़ा प्रमाणात विचारणा होत आहे, अशी माहिती या मेळाव्याचे आयोजक आणि श्री सद्गुरू ग्रुप या संस्थेचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरोहितांचे आर्थिक उत्पन्न चांगले असते. तरीही लग्न जुळत नसल्याने त्यांच्यात नैराश्य येते. त्यांचा पेहराव, त्यांच्या घरातील वातावरणाबाबतचे गैरसमज, त्यांचे औपचारिक शिक्षण कमी असणे, याउलट मुलींच्या शिक्षणाचे वाढलेले प्रमाण यामुळे त्यांचे विवाह रखडायचे. पण पुण्यातील मेळाव्यानंतर मुलींच्या पालकांकडून प्रतिसाद वाढला आहे. पुढील काही महिन्यांत किमान पन्नास ते शंभर जणांची लग्नं ठरण्याची शक्यता आहे.
– यशवंत कुलकर्णी (अध्यक्ष, श्री सद्गुरू ग्रुप)

पौरोहित्य करणाऱ्यांचा धोतर हा पेहराव मुलींना खटकतो. मात्र, त्यांना समाजात मान आहे हे त्या लक्षात घेत नाहीत. पुरोहितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवतोय, पण ते प्रमाण फार कमी आहे. त्यासाठी पालकांची व मुलींची मानसिकता बदलायला हवी. आता गुरुजी हायटेक झालेत. सर्वात आधुनिक अँड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप वापरतात. ऑनलाइन पूजा करतात. तरीही त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन फारसा बदलत नाही.     – महेश खळदकर
(पौरोहित्य करणारा व्यावसायिक)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purohits now to get married