अमेरिकेतील पंचवीस विद्यापीठांची, विविध अभ्यासक्रमांची माहिती, व्हिसाची प्रक्रिया, प्रवेश परीक्षा अशा विविध मुद्दय़ांची माहिती एकाच छताखाली घेण्याची संधी शनिवारी विद्यार्थ्यांना मिळाली. अमेरिकन दूतावासातर्फे अमेरिकेतील विद्यापीठांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
अमेरिकेतील कोलंबिया, हार्वर्ड, इंडियाना, मिशिगन, पेनस्टेट यांसारखी पंचवीस विद्यापीठे या मेळाव्यात सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे ‘गॅल्युडेट’ विद्यापीठही या मेळाव्यात सहभागी झाले होते. मेळाव्याला दिवसभरात साधारण २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी भेट दिली. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या शाखांमधील शिक्षणाच्या संधी जाणून घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल होता. प्रवेश परीक्षा, व्हिसासाठी करावी लागणारी प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या विविध सत्रांचेही या मेळाव्यात आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याबाबत दूतावासाचे अधिकारी फिलिप रॉस्कम यांनी सांगितले, ‘‘अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी १२ टक्के विद्यार्थी हे भारतीय असतात. २०१२-१३ मध्ये अमेरिकेत जवळपास ९६ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत होते. भारतीय विद्यार्थ्यांचा कल ज्या अभ्यासक्रमांसाठी आहे, त्या विद्यापीठांचा या मेळाव्यात प्रामुख्याने सहभाग आहे. भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी येणाऱ्या साधारण ७८ टक्के विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमासाठी दिसतो. मात्र, त्याचबरोबर लिबरल आर्ट्समधील अभ्यासासाठीही आता भारतीय विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. भारतात या प्रकारचे मेळावे यापूर्वी घेतले आहेत. पुणे हे शिक्षणासाठी ओळखले जाते, त्यामुळे पुण्यात हा मेळावा घेण्यात आला.’’
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2014 रोजी प्रकाशित
अमेरिकेतील विद्यापीठांचा पुण्यात मेळावा
अमेरिकेतील पंचवीस विद्यापीठांची, विविध अभ्यासक्रमांची माहिती, व्हिसाची प्रक्रिया, प्रवेश परीक्षा अशा विविध मुद्दय़ांची माहिती एकाच छताखाली घेण्याची संधी शनिवारी विद्यार्थ्यांना मिळाली.

First published on: 14-09-2014 at 02:58 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally of american universities