पुणे : जिल्ह्यातील धोकादायक असलेल्या २३ गावांपैकी आंबेगाव तालुक्यातील पाच दरडप्रवण गावांचे खासगी जागांवर पुनर्वसन केले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारला पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्याकरिता करण्यात येणारे भूसंपादन लवकरच सुरू केले जाणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावात ३० जुलै २०१४ रोजी दरड कोसळून १५१ जणांचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले होते. डोंगर उतारावरील गावे आणि वाड्या यांचे सर्वेक्षण केल्यावर ९५ ठिकाणे ही धोकायदायक असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर या ठिकाणांची भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) या विभागाकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार २३ गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) धोकादायक असलेल्या गावांमध्ये सुरक्षेचे उपाय सुचविले. त्यानुसार या गावांमध्ये विविध कामे करण्यात येत आहेत. मात्र, २३ गावांपैकी आंबेगाव तालुक्यातील फुलवडेअंतर्गत भगतवाडी, माळीणअंतर्गत पसारवाडी, आसणे, जांभोरीअंतर्गत काळेवाडी क्रमांक एक आणि दोन, बेंडारवाडी ही पाच गावे माळीणपासून जवळच आहेत. या गावांमध्ये सुरक्षिततेबाबतीतील कामे करण्यात आली, तरी धोका कायमचा टळणार नसल्याने या गावांतील नागरिकांकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या गावांचे खासगी जागांवर पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे खासगी जागांवर पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती भूसंपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे. भोर तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचाही प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे.’
दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील पाच गावे, भोर तालुक्यातील चार, मावळ तालुक्यातील आठ गावे, खेड, वेल्हे तालुक्यातील प्रत्येकी दोन गावे, मुळशी आणि जुन्नर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. वेल्हे तालुक्यातील घोल आणि मावळ तालुक्यातील भुशी या गावामध्ये संरक्षणात्मक कामे करण्याची गरज नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या २३ गावांवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जागता पहारा ठेवला आहे. या गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कोतवाल यांनी दररोज भेटी देऊन दर दोन तासांनी सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.
आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे खासगी जागांवर पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे. लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील धोकादायक गावे
आंबेगाव – फुलवडे अंतर्गत भगतवाडी, माळीण अंतर्गत परसवाडी, आसाणे, जांभोरी अंतर्गत काळेवाडी, बेंडारवाडी
मावळ – लोहगड, ताजे, बोरज, तुंग-भैरवनाथ मंदिर परिसर, माळवाडी, गबाळे वस्ती, मोरमाची वाडी, भुशी
खेड – भोरगिरी पदर वस्ती, भोमाळे
भोर – जांभूळवाडी, पांगारी सोनारवाडी, धानवली खालची
मुळशी – घुटके
वेल्हा – आंबवणे, घोल
जुन्नर – निमगिरी अंतर्गत तळमाची