जागतिक कीर्तीचे मोहन वीणावादक पं. विश्वमोहन भट्ट यांच्या सांगीतिक कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सव पूर्तीनिमित्त त्यांचे पुत्र सलिल भट्ट यांनी ‘विश्वकंस’ या नव्या रागाची निर्मिती केली आहे. एका अर्थाने ‘सात्त्विक वीणा’ या वाद्याने ‘मोहन वीणा’ या वाद्याला अभिवादनच केले आहे.
सलिल भट्ट या युवा वादकाने ‘स्टिंग्ज ऑफ फ्रीडम’ या नव्या अल्बमची निर्मिती केली आहे. यामध्ये ‘जोग’ आणि ‘जोग कंस’ या दोन रागांचा अनोखा मिलाफ करून त्यांनी ‘विश्वकंस’ हा नवा राग निर्मिला आहे. एक खास तंत्र वापरून या रागामध्ये रिषभ स्वर गुंफून उत्कट परिणाम साधला आहे. अनुराग आणि आनंद या भावनांचे मिश्रण होऊन अवतरलेली ही निर्मिती रात्रीची चाहूल लागण्याच्यावेळेची असून,ती रसिकांच्या मनाचा ठाव घेईल, अशी भावना सलिल भट्ट यांनी व्यक्त केली. या अल्बममध्ये कोमल रिषभ आणि कोमल निषाद या स्वरांच्या नजाकतीतून सादर झालेला राग ‘अहिर भैरव’ दिवसाची सुरुवात सुखद करेल, असेही त्यांनी सांगितले. या अल्बममध्ये पं. विश्वमोहन भट्ट (मोहन वीणा), सलिल भट्ट (सात्त्विक वीणा) या पिता-पुत्रांसह ‘सात्विक’ या तिसऱ्या पिढीचाही सहभाग आहे. १५ वर्षांच्या सात्त्विक याने पं. विश्वमोहन भट्ट यांनी निर्मिलेल्या ‘विश्ववीणा’ या वाद्याच्या काही तारा छेडल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salil bhatta created new raga vishwakauns