|| चिन्मय पाटणकर
राष्ट्रीय स्तरावर विज्ञानाच्या क्षेत्रात असलेले पुण्याचे योगदान आणि विज्ञानाच्या विविध शाखांतील अनेक महत्त्वाच्या संस्था पुण्यात असूनही आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा मान अद्याप पुण्याला मिळालेला नाही. त्यामुळे या महोत्सवाच्या आयोजनाचा मान पुण्याला कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्र शासनाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि विज्ञानभारती यांच्यातर्फे आयोजित ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान पाचवा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव यंदा कोलकाता येथे होत आहे. या पूर्वीचे चार महोत्सव दिल्ली, चेन्नई आणि लखनऊ येथे झाले आहेत. पुण्यात आंतरविद्यापीठीय खगोल भौतिकी केंद्र (आयुका), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस) राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (एनसीआरए) डीआरडीओ, सीडॅक, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (आयआयटीएम) अशा मूलभूत विज्ञान, संरक्षण, संगणक, खगोलशास्त्र, हवामान अशा विज्ञानाच्या विविध शाखांशी संबंधित संस्था पुण्यात आहेत. त्यामुळे महत्त्वपूर्ण संशोधनही पुण्यातून होत असते. मात्र, आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या बाबतीत आतापर्यंत पुण्याचा विचार झालेला नाही.
विज्ञानभारतीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर म्हणाले, ‘विज्ञान भारती आणि केंद्र सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग यांच्या सहयोगाने आतापर्यंत विविध विज्ञान परिषदांचे पुण्यात आयोजन झाले आहे. त्या शिवाय विज्ञान संमेलनही २००० मध्ये पुण्यात झाले होते. पुण्यात बऱ्याच विज्ञान संस्था असल्याने विविध कार्यक्रम पुण्यात सातत्याने होत असतात. अन्य शहरांना तशी संधी मिळत नाही असे सरकारच्या पातळीवर म्हणणे आहे. त्यामुळे अन्य शहरांना संधी मिळण्याच्या दृष्टीने आतापर्यंतच्या महोत्सवांचे आयोजन झाले.
आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा मोठा आणि महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने त्याचे पुण्यात आयोजन व्हायला हवे. त्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा लागेल. मात्र, आंतरराष्ट्रीय महोत्सव पुण्यात होण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल.’
आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे यंदा पाचवे वर्ष आहे. लवकरच महोत्सवाचा मान पुण्याला मिळेल याची खात्री आहे. – डॉ. सोमक रायचौधुरी, संचालक, आयुका