मन्या सुर्वे हा माझा भाऊ आहे. मला अस वाटतं की मी तसा होऊ नये यासाठी आई मला गावाला घेऊन गेली असे वक्तव्य जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. ते कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नानांचे चाहते उपस्थित होते. समीरन वाळवेकर यांनी नानांची मुलाखत घेतली. तेव्हा अनेक विषयांवर त्यांनी आपली मतं मांडली.
नाना यांनी सुरुवातीच्या काळात गुन्हेगारी भूमिका केल्या आहेत असा प्रश्न करत एक चित्रफीत दाखवण्यात आली. यानंतर जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गुन्हेगारीवर बोलत असताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. नाना म्हणाले की, “गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे मामा. त्यांची मुलंही तशी होती. त्यांच्यापासून लांब राहावं म्हणून आई मुरुडला गावी घेऊन गेली,” असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना तुम्ही प्रत्यक्षात मोठ्या गुन्हेगाराला बघितलंय किंवा भेटलात का? असा सवाल करण्यात आला. यावर मन्या सुर्वे असं त्यांनी उत्तर दिलं. मन्या सुर्वे हा माझा भाऊ आहे. माझ्या मामाचा तो मुलगा असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “मला अस वाटतं की मी तसा होऊ नये यासाठी आई मला गावाला घेऊन गेली. कुठेतरी सुप्त असतंच. गुंड हे शांत असतात. व्हायलन्स हा ओरडत नाही. अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो. पण सुशिक्षित माणूस गुंड झाल्यानंतर गोंधळ असतो. तो सगळा विचार करू शकतो,” असंही ही नाना म्हणाले.