आर्थिक आघाडय़ांवर, तसेच अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षिततेत आलेले अपयश, वाढता दहशतवाद, भ्रष्टाचार, महागाई हे आगामी लोकसभेसाठीच्या प्रचाराचे भारतीय जनता पक्षाचे मुख्य सूत्र असेल. पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी हे सूत्र मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत आणि पक्षाच्या प्रदेश बैठकीतही स्पष्ट केले. लोकसभेत आम्ही विरोधक म्हणून काम करायचे नाही, तर काय चिअर लिडर म्हणून काम करायचे का, असाही प्रश्न त्यांनी पंतप्रधानांना विचारला.
महाराष्ट्र प्रदेश भाजपची दोन दिवसांची बैठक मंगळवारी सकाळी बालेवाडी येथे सुरू झाली. या बैठकीचे उद्घाटन राजनाथसिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जी भूमिका मांडली त्यातून आगामी लोकसभेसाठी पक्षाचे प्रचाराचे तसेच काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचे काय सूत्र असेल, ते स्पष्ट झाले.
देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींमुळे देशात ही परिस्थिती उद्भवली, हे भाजपला मान्य नाही. देशात आर्थिक धोरणे अत्यंत चुकीच्या पद्धताने अमलात आणली जात आहेत. त्याबरोबरच योग्य नियोजनाचा अभाव आहे आणि भ्रष्टाचारही वाढला आहे. या कारणांमुळे आर्थिक संकट ओढवल्याचे राजनाथसिंह म्हणाले. वाजपेयी सरकारच्या काळात आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जाची परतफेड केली होती. सध्याचे सरकार मात्र अत्यंत हतबल आणि निराश आहे, अशीही टीका त्यांनी केली.
आर्थिक संकटाला विरोधी पक्ष म्हणजे भाजप जबाबदार आहे असे विधान करणारे पंतप्रधान कदाचित जगाच्या इतिहासात यापूर्वी बघायला मिळाले नसतील, असे प्रतिपादन करून, आíथक सुधारणेसंबंधीच्या विधेयकाला आम्ही पाठिंबा दिला नाही असे एकही विधेयक नाही, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
विरोधकांमुळे लोकसभेचे कामकाज चालत नाही असा दोष काँग्रेस देत आहे; पण जनतेने आम्हाला विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि ती आम्ही दोन्ही सभागृहात समर्थपणे निभावली आहे. लाखो कोटींचे अनेक घोटाळे देशात होत असताना आम्ही संसदेत विरोधक म्हणून काम करायचे नाही, तर काय चिअर लिडर म्हणून काम करायचे का, अशीही विचारणा राजनाथसिंह यांनी केली.
पाकिस्तान, चीनकडून घुसखोरी सुरू आहे. भारतीय सैनिक मारले जात आहेत. परिस्थिती १९६२ मध्ये होती तशी दिसत आहे. तरीही आपले पंतप्रधान पाकिस्तानबरोबर चर्चा करीन असे सांगत आहेत. अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षितेबाबतची धोरणेच चुकत आहेत. दहशतवाद, नक्षलवाद वाढत आहे. महाराष्ट्रातील सरकारचीही परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्याहून दु:खदायक गोष्ट कोणती असेल, असेही ते म्हणाले.