पुणे आणि पिंपरीतील दहा लाख प्रवासी रोज पीएमपीने प्रवास करतात; पण कोणत्या क्रमांकाची गाडी कोणकोणत्या थांब्यांवरून कोठे जाते याचे प्रवाशांना अचूक मार्गदर्शन करणारी कोणतीही यंत्रणा पीएमपीकडे नाही. पीएमपीच्या प्रवाशांची ही अडचण सोडवण्यासाठी प्रवाशांना मार्गदर्शन करणारे नकाशे पुण्यातील श्वेता कांबळे हिने विकसित केले असून मुंबईत आयआयटीमध्ये आयोजित प्रदर्शनामध्येही श्वेताच्या या नकाशांचे कौतुक झाले. पीएमपीने या नकाशांचा उपयोग आता प्रवाशांना करून द्यावा, याची प्रतीक्षा श्वेताला आहे.
श्वेताचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागेत आणि जीडी आर्टचे शिक्षण अभिनव कला महाविद्यालयात झाले आहे. आयआयटीमधील इंडस्ट्रियल डिझायनिंग सेंटरमध्ये व्हिजुअल कम्युनिकेशन डिझायिनग या अभ्यासक्रमासाठी तिची निवड झाली. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच काही विषय निवडून जे प्रकल्प सादर करावे लागतात, त्यात श्वेताने पीएमपी प्रवाशांना मार्गदर्शक ठरतील असे नकाशे तयार करण्याचा प्रकल्प साकारला. बिबवेवाडीतून पीएमटीने प्रवास करून ती रोज हुजूरपागेत जायची. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणींची तिला चांगलीच माहिती होती. त्यातूनच नकाशे तयार करण्याची कल्पना साकारल्याचे ती सांगते.
पीएमपी डेपोमध्ये एखादा प्रवासी गेल्यानंतर त्या डेपोतून कोणत्या गाडय़ा कोणत्या ठिकाणी व कोणत्या मार्गाने जातात तसेच या मार्गावर कोणकोणते थांबे आहेत, या गाडय़ांच्या वेळा काय आहेत, किती वेळाने त्या मार्गावर गाडय़ा धावतात, त्यांची वारंवारिता किती आहे याची माहिती प्रवाशांना व्हावी अशा पद्धतीने श्वेताने हे नकाशे तयार केले आहेत.
स्वारगेट आणि इंदिरानगर या डेपोंमधील बसमार्गाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर श्वेताने त्यांचे नकाशे तयार करून जेव्हा ते प्रत्यक्ष डेपोंमध्ये लावले, त्या वेळी शेकडो प्रवाशांनी ते पाहून अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. पीएमपीचे अधिकारी, चालक, वाहक, कर्मचारी अशा सर्वानीच हे नकाशे प्रवाशांना उपयुक्त ठरतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. नुकत्याच आयआयटी, पवईमध्ये झालेल्या डिझाइन डिग्री शोमध्येही श्वेताचे नकाशे लक्षवेधी ठरले होते. पीएमपीकडून या नकाशांचा उपयोग सर्व डेपोंमध्ये केला जावा यासाठी आता श्वेता प्रयत्नशील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta kamble pmp route frequency