आकुर्डी येथे डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विज्ञान
अॅप व गेम्स तयार करण्यात तरूणांना कल्पकता वापरता येते व तो माहिती तंत्रज्ञानाची क्षितिजे विस्तारत असताना एक उद्योग म्हणूनही पुढे येत आहे. ‘गेस मराठी मुव्हीज’ हा गेम भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांना समर्पित करण्यात आला आहे. त्यात मराठी चित्रपटांमधील दृश्ये किंवा पोस्टर्स दाखवली जातात व त्यावरून तो मराठी चित्रपट कोणता हे ओळखायचे आहे; पण नुसते चित्रपटाचे नाव ओळखून भागणारे नाही तर नंतर त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे. एकप्रकारे नाव ओळखण्यासाठी उपयोगी पडणारी ती सूचनाच आहे. ‘राजा हरिश्चंद्र’पासून आताच्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटांचा प्रवास या गेमममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपले सामान्य ज्ञानही वाढते शिवाय एरवी दुर्लक्षित असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासही त्यानिमित्ताने आपल्याला काही प्रमाणात कळतो. दोनशे मराठी चित्रपटांचा समावेश यात आहे.यामुळे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देशही साध्य होत आहे. तुम्हाला चित्रपट ओळखता आला नाही तर व्हॉटसअॅप, फेसबुकवर त्याचे चित्र पाठवून तुम्ही तो चित्रपट ओळखण्यासाठी मित्राची मदतही घेऊ शकता, आता यापुढे हिंदूी चित्रपटांसाठीही असा गेम तयार करण्यात येणार आहे, असे आकाश जाधव याने सांगितले.
गेम तयार करण्याच्या पद्धतीबाबत त्याने सांगितले की, यात कल्पकतेलाही महत्त्व आहे, गेम तयार केल्यानंतर तुम्हाला तो प्लेस्टोअरवर पंचवीस डॉलर्स भरून टाकता येतो. नंतर आवडीप्रमाणे लोक तो डाऊनलोड करतात.त्याच्या जोडीला ज्या जाहिराती असतात, किती ग्राहक तुमचा गेम वापरतात व त्या जाहिराती पाहतात यावरून काही आर्थिक वाटा गेम तयार करणाऱ्याला मिळतो.
स्मार्ट अटेंडन्स अॅप
‘स्मार्ट अटेंडन्स’ या अॅपबाबत त्याने सांगितले की, हे अॅपही मोफत असून त्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवता येते. मानवी पातळीवर शिक्षक हजेरी घेतात तेव्हा त्याला तीन मिनिटे लागतात पण या अॅपने हेच काम दीड मिनिटात केले जाते, त्यासाठी पटसंख्या, विद्यार्थ्यांची नावे या अॅपला द्यावी लागतात. शिवाय त्या विद्यार्थ्यांची हजेरी शिक्षण संस्थांच्या निकषाप्रमाणे ७०-७५ टक्के आहे किंवा नाही त्याचाही आकडा लगेच कळतो. हे अॅप अमेरिका, फिलिपिन्स, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात व मलेशिया तसेच भारतातही मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहे.