शास्त्रीय सांख्यिकी तपशील गोळा करण्याची प्रक्रिया
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागास वर्गाबाबतचा (ओबीसी) ८० पानांचा अंतरिम अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. आता शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इम्पिरिकल डाटा) गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होत असून त्या अनुषंगाने सोमवारी (२१ फेब्रुवारी) पुण्यात आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हा तपशील जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांबाबत या बैठकीत नियोजन केले जाणार आहे. आयोगाचे कार्यालय पुण्यात येरवडा येथील महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (मेडा) इमारतीत आहे. शास्त्रीय सांख्यिकी तपशील कशा पद्धतीने जमा करायचा, त्याचे टप्पे आणि प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. याबाबत बैठकीत चर्चा केली जाईल.
आयोगाची बैठक सोमवारी होणार आहे. त्या बैठकीत आयोगाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, तसेच इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी तयारी यांवर चर्चा केली जाणार आहे. इम्पिरिकल डाटा जमा करण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक महिना अगोदर कार्यालयीन तयारी पूर्ण केली जाणार आहे. राज्य सरकारने संशोधन अधिकारी या पदाची नेमणूक अद्याप केलेली नाही, असे आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
निधीची तरतूद राज्य सरकारने आयोगाला कामकाज करण्यासाठी मंजूर केलेल्या निधीपैकी ८३ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीतून पहिल्या टप्प्यात आयोगाचे अध्यक्ष आणि कार्यालयीन कामकाजासाठी दोन वाहने खरेदी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
मंजूर निधीपैकी १७ लाख रुपयांची तरतूद वीज आणि दूरध्वनी देयके, तर आयोगाच्या सदस्यांना प्रवास खर्च म्हणून एक लाख ७२ हजार रुपयांची तरतूद केली आहे. यापूर्वी पाच कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. निधी वेळेत खर्च करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सदस्य सचिव करणार आहेत.