डंखहीन मधुमक्षिका पालन आता सहज शक्य; गृहसंकुले, बंगल्यांमध्ये उपयुक्त; पुण्यात प्रयोग यशस्वी

मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आता डंखहीन मधुमक्षिका (पोयाच्या मधमाश्या) पालन करता येणार आहे.

दत्ता जाधव

पुणे : मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आता डंखहीन मधुमक्षिका (पोयाच्या मधमाश्या) पालन करता येणार आहे. सोसायटीच्या गच्चीत, सोसायटीच्या लहान बगिच्यांमध्ये आणि बंगल्याच्या मोकळय़ा परिसरात मधुमक्षिका पालन अगदी सहजपणे करता येईल. त्याचा यशस्वी प्रयोग पुण्यात करण्यात आला आहे.

अलीकडे शहरातील सोसायटय़ा आणि बंगल्याच्या टेरेसवर फुलझाडे, फळझाडे आणि भाजीपाला लावला जात आहे. तसेच बंगल्याच्या अंगणात देखील फुलझाडे, फळझाडे, भाजीपाला लावला जातो. गॅलरीत तुळस, सब्जा अशा औषधी वनस्पती आणि फुलझाडे लावली जातात. या सर्व प्रकारच्या वनस्पतींच्या फुलांमधील मध गोळा करण्याचे काम या डंखहीन मधमाश्या करतात. या मधमाश्या चावत नाहीत; त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठांना त्यांच्यापासून कोणताही धोका पोचत नाही, अशी माहिती ‘बी बास्केट’ संस्थेचे अध्यक्ष अमित गोडसे यांनी दिली. या संस्थेद्वारे पोयाच्या मधुमक्षिकांवर प्रयोग करण्यात येत आहेत.

या मधमाश्या तुळशीची मंजिरी, गॅलरीत लावलेली वेगवेगळी फुले, टेरेसवरील फुले आणि पालेभाज्यांच्या फुलांवर बसून त्या फुलांमधील मध गोळा करण्याचे काम करतात. शिवाय या मधमाश्यांमुळ गच्चीवर आणि बगिच्यांमध्ये परागीकरण मोठय़ा प्रमाणात होते. परिणामी तेथील भाजीपाला उत्पादनात वाढ होते. अशा प्रकारचा प्रकल्प करण्यासाठी इच्छुकांना ८३०८३००००८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

आयुर्वेदिक मध निर्मिती शक्य..

आपल्याला आयुर्वेदिकदृष्टय़ा औषधी मूल्य असलेल्या ज्या प्रकारच्या वनस्पतीचा मध हवा आहे, त्या प्रकारची औषधी झाडे आपल्या टेरेसवर लावून हव्या त्या प्रकाराचा मध तयार करता येतो. मधमाश्या औषधी वनस्पतींच्या फुलांमधील मध शोषण करून पेटीमध्ये एकत्रित करतात. त्याद्वारे दर्जेदार, आपल्याला आवश्यक असणारा आणि त्या त्या औषधी झाडपाल्याचा मध आपल्याला सहजपणे या मधुमक्षिकांद्वारे संकलित करता येतो.

शहरांतील पर्यावरणाच्या संवर्धनात मधुमक्षिका मोठे योगदान देऊ शकतात, सोसायटय़ा, बंगल्यांमध्ये मधुमक्षिकांचे पालन झाल्यास शहरी पर्यावरणाला मोठा हातभार लागणार आहे. सोसायटय़ांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळणार आहे.

 – अमित गोडसे, अध्यक्ष बी बास्केट.

असे आहे आर्थिक गणित..

डंखहीन मधमाश्यांच्या एका पेटीपासून वर्षांला ३०० ते ५०० ग्रॅम शुद्ध मध मिळतो. त्यामुळे मधुमक्षिका पैदास करून सोसायटय़ांना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करता येईल.

या मधमाश्या कोणत्या?

भारतामध्ये नैसर्गिक अधिवासात पोयाच्या मधमाश्या म्हणजेच डंखहीन मधमाश्या सापडतात. पोयाच्या माश्यांचा आकार खूप लहान असल्यामुळे या माश्या आंबा, टोमॅटो अशा अगदी छोटय़ा आकाराच्या फुलांमध्ये देखील सहजगत्या प्रवेश करू शकतात. या माश्यांनी निर्माण केलेला मध हा अतिशय औषधी आणि उत्कृष्ट प्रतिचा समजला जातो.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stingless beekeeping now easily possible useful housing complexes bungalows experiment successful ysh

Next Story
रुग्णवाढीची नवी चिंता; राज्यातही ओमायक्रॉनच्या नव्या प्रकाराचे बाधित; पुण्यात सात जणांना संसर्ग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी