विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत, तोंडी परीक्षा वेळेवर होत नाहीत, या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांच्या नेहमीच्याच तक्रारी. मात्र, आता विद्यापीठानेच निकालाचा सहा महिन्यांचा कालावधी अधिकृत करून टाकला आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमई) तोंडीपरीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता निकालासाठी सहा महिने थांबावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जवळपास एक वर्ष वाया जाणार असल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे चौथे सत्रही दोन भागांत विभागल्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रम चार सत्रांचा असतो. या अभ्यासक्रमासाठी चौथ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना लघुशोध निबंध सादर करायचा असतो. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत लघुनिबंध सादर केल्यानंतर त्यांच्या तोंडी परीक्षेचे आयोजन करण्यात येत असे. त्यानंतर तोंडी परीक्षा झाल्यानंतर लगेच काही दिवसांत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येत असे. त्यामुळे एकत्र निकाल जाहीर होत नसला, तरी परीक्षकांची उपलब्धता, वेळा असे सगळे गणित जमून परीक्षा होत असत. मात्र आता लघुनिबंध सादर केल्यानंतर अंतिम निकालासाठी सहा महिने थांबावे लागणार आहे.
विद्यापीठाने या परीक्षांचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा लघुशोध निबंध सादर करण्यासाठी आणि त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने आता वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी जूनमध्ये किंवा विलंब शुल्क भरून जुलैपर्यंत लघुनिबंध सादर करायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यांत तोंडी परीक्षेसाठी परीक्षक निश्चित करून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यांत परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यांत या परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जून किंवा जुलै महिन्यांत प्रत्यक्ष शिक्षण संपूनही निकालासाठी मात्र नोव्हेंबपर्यंत थांबावे लागणार आहे. जूनमध्ये लघुनिबंध सादर करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते नोव्हेंबरमध्ये द्यायचे आहेत. त्यांचा निकाल एप्रिल अखेरीस जाहीर होणार आहे. या दरम्यान एखाद्या विद्यार्थ्यांच्या विषयानुसार परीक्षक उपलब्ध झाले नाहीत किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे परीक्षा वेळेत झाली नाही, तर त्या विद्यार्थ्यांला एक वर्ष थांबावे लागणार आहे.