पुणे : राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यात एकाच वेळी राबवण्याबाबतची माहिती पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या १५ प्रवेश परीक्षांच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सीईटी सेल यांनी २८ मे २०१९ व २२ मार्च २०१९ रोजी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची एकसारखी प्रवेश प्रक्रिया करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता राहात नसल्याने असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिटय़ूटस् इन रुरल एरिया या संघटनने अभियांत्रिकी, कृषी, विधी, वास्तुकला, औषनिर्माणशास्त्र, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश फेरी एकाच वेळेस समुपदेशक फेरीसह राबवण्याबाबत, पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशाची अंतिम तारीख, बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी, या प्रमुख मागण्यांचे निवेदन दोन वेळा सीईटी सेलला दिले. मात्र, त्याबाबत शासनाने निर्णय न घेतल्याने या संदर्भात संघटनेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत संघटनेच्या मुद्दय़ांच्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया एकसमान करण्याबाबतचा निर्णय १५ दिवसांत कळवावा आणि निर्णयाची माहिती संघटनेला देण्याचा आदेश दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली.
संघटनेच्या मागण्या
• बारावीनंतरच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी तयार झाल्यावर, प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे (कॉलेजांचे पसंती क्रमांक अर्ज भरणे, जागावाटप, प्रवेश घेणे, प्रवेश फेरीतील फेऱ्यांची संख्या/रचना, प्रवेश फेरीतील टप्पे) यांचे नियोजन एकाचवेळी करावे.
• परराज्यात पहिल्या दोन प्रवेशाच्या फेऱ्या सीईटीच्या आधारावर घेतल्या जातात, तर तिसरी फेरी ही विना सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. तशीच सुविधा महाराष्ट्रातही असावी.
• सर्व केंद्रीभूत प्रवेशाच्या फेऱ्या (कॅप राउंड) संपल्यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या रिक्त जागी ईडब्ल्यूएसच्या पात्र विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर प्रवेशास परवानगी द्यावी.
प्रत्येक अभ्यासक्रमाची विद्यार्थी संख्या वेगळी असते, परीक्षा वेगवेगळय़ा वेळी होतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवली जाते. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा अभ्यास करून, उच्च आणि तंत्रशिक्षण संचालनालयाशी चर्चा करून प्रवेश प्रक्रियेबाबतचा निर्णय घेतला जाईल. – रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल