शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पशुखाद्य उपलब्ध व्हावे यासाठी १९६५ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाने सुग्रास या नावाने पशुखाद्याचे उत्पादन चिंचवड येथे सुरु केले. मात्र, बाजारातील स्पर्धा आणि शासनाकडून झालेले दुर्लक्ष यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या घराघरात पोचलेल्या सुग्रास पशुखाद्याचे उत्पादन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाने चिंचवड एमआयडीसी येथे सुग्रास या पशुखाद्य निर्मिती कारखान्याची स्थापना केली होती. या कारखान्यातून एकूण २७ प्रकारची उत्पादने घेतली जात होती. कुक्कुटपालनासाठी आवश्यक खाद्य तसेच अन्य जनावरांसाठी आवश्यक पशुखाद्याचे उत्पादन चिंचवड येथील कारखान्यामध्ये होत होते. सन १९७० ते १९९८-९९ पर्यंत हा कारखाना तीन पाळ्यांमध्ये सुरळीत चालत होता. मात्र, त्यानंतर या कारखान्यातून होणारे उत्पादन कमी होण्यास सुरुवात झाली. बाजारपेठेतील इतर पशुखाद्यांची गुणवत्ता आणि मूल्य यांच्याशी स्पर्धा करताना या कारखान्याला राज्य शासनाकडूनही हवे तेवढे पाठबळ मिळाले नाही. महामंडळाचा राज्यात सांगलीसह आणखी एक पशुखाद्य निर्मितीचा कारखाना आहे. तेथील उत्पादन बऱ्यापैकी सुरु असताना चिंचवड येथील कारखान्यामधील उत्पादन सन १९९९ पासून कमी होत गेले.

गेल्या काही वर्षांपासून सुग्रास कारखान्यामध्ये महामंडळाने स्वत: उत्पादन करण्याचे थांबविले होते. निविदा काढून ठेकेदाराला उत्पादन करण्यासाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. या ठेकेदाराने काही वर्ष या कारखान्यामध्ये उत्पादन सुरळीत ठेवले. मात्र, मुदत संपल्यानंतर कारखान्यातील उत्पादन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. महामंडळाचा चिंचवड येथील सुग्रास कारखाना १० ते ११ एकर जागेवर उभा आहे. कारखान्याची यंत्रसामग्रीही कोटय़वधी रुपयांची आहे. उत्पादित मालासाठी चार मोठी गोदामे कारखान्याच्या आवारात तयार करण्यात आली आहेत. उत्पादन कमी झाल्यामुळे यातील काही गोदामे भाडय़ाने देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. कारखान्यामध्ये विविध विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याठिकाणी नवीन कर्मचारी नेमण्यात आलेले नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेला कारखाना सुरु करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सध्या सुरु आहेत.

सुग्रास कारखान्यामध्ये उत्पादन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया करुन नवीन ठेकेदार नेमण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून उत्पादन सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

डॉ. पराग गोगले, व्यवस्थापक, सुग्रास कारखाना

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugras factory chinchwad sugras factory cattle feed production